भारतीय सुरक्षा यंत्रणांची गुप्त माहिती पाकिस्तानच्या आयएसआयला पुरविल्याप्रकरणी हवाई दलातून निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. या अधिकाऱ्याचे नाव राजनाथ असून सोमवारी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला पंजाबमधून ताब्यात घेतले. राजनाथ हा भारतीय हवाई दलाच्या भटिंडा येथील तळावर कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी सुरक्षा यंत्रणांनी राजनाथ याच्याविरुद्ध ठोस पुरावे सादर केल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. राजनाथ हा मूळचा केरळातील राहणारा असून सोमवारी त्याला अटक करण्यात आल्यानंतर दिल्लीत न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने राजनाथला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.
राजनाथवर पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोप असून त्याने ई-मेल्स आणि अंतर्गत संदेश व्यवस्थेच्या माध्यमातून भारतीय सुरक्षा यंत्रणांची माहिती आयएसआयला पुरविल्याचे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर राजनाथ एका महिलेच्या संपर्कात आला. या महिलेनेच राजनाथला आयएसआयचा हेर बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आयएसआय संघटनेचे भारतातील हेरगिरीचे जाळे उदध्वस्त करण्याच्यादृष्टीने राजनाथची अटक महत्त्वपूर्ण असून, गुन्हे शाखेकडून यासंबंधी लष्कराशी संबंधित असणाऱ्या आणखी पाचजणांना अटक करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा