संयुक्त राष्ट्रांचे माजी अधिकारी आणि केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्याशी २०१० मध्ये विवाहबद्ध झाल्यापासून सुनंदा पुष्कर आणि वाद हे समीकरण झाले होते. इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोची टस्कर्स या संघाची मालकी असो वा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी थरूर यांची ५० कोटींची मैत्रीण असे केलेले वक्तव्य असो किंवा मग अगदी परवापर्यंत पाकिस्तानी महिला पत्रकार मेहेर तरार यांच्याशी त्यांनी घातलेले ट्विटवाद असो, या सर्वच पाश्र्वभूमीवर सुनंदा पुष्कर नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिल्या.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात एका मुलाखतीच्या निमित्ताने मेहेर तरार (४५) आणि शशी थरूर यांची भेट झाली होती. तेव्हापासून त्यांच्यात काहीतरी शिजत असल्याच्या संशय होता. त्याचा स्फोट अखेरीस दोन दिवसांपूर्वी झाला. वैद्यकीय उपचारांसाठी सुनंदा पुष्कर बाहेरगावी गेल्या होत्या. याच काळात तरार यांनी थरूर यांच्याशी जवळीक साधत आपल्या संसारात बिब्बा घालत असल्याचा आरोप सुनंदा यांनी केला. ट्विटरवरच सुनंदा यांनी हा आरोप केल्यामुळे तिघांमधील वाद चव्हाटय़ावर आला. त्यातच पुष्कर यांनी तरार या आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या हस्तक असल्याचा आरोप केल्यामुळे संतप्त झालेल्या तरार यांनी सुनंदा यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची धमकी दिली होती.
या सर्व वादात अखेरीस थरूर यांनी हस्तक्षेप करून सुनंदा व आपले वैवाहिक जीवन सुखात असल्याची ट्विप्पणी करत वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्यातील वाद न शमल्याचेच शुक्रवारी अधोरेखित झाले.

घटनाक्रम..
० अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अधिवेशनात
   शशी थरूर सहभागी
० शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत थरूर अधिवेशनस्थळी
० यादरम्यान सुनंदा यांचा हॉटेल लीला पॅलेसमध्ये मुक्काम
० दुपारी साडेतीनच्या सुमारास त्या हॉटेल परिसरात दिसल्या
० सायंकाळी सातच्या सुमारास हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या
   खोलीचे दार ठोठावले
० आतून काहीच प्रतिसाद आला नाही
० आठ वाजता थरूर हॉटेलमध्ये आले
० त्यांनीही सुनंदा यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला
० अखेरीस पोलिसांना पाचारण करण्यात आले
० दरवाजा तोडल्यानंतर खोलीतील बिछान्यावर सुनंदा
   यांचा मृतदेह आढळला