नवी दिल्ली : राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना-ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी बुधवारी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध केला. या विधेयकाच्या आडून वक्फची लाखो एकर जमीन हडपण्याचा केंद्राचा हेतू असल्याचा आरोप सावंत यांनी केला. ठाकरे गटाने सभागृहात उघडपणे घेतलेल्या विरोधी भूमिकेमुळे शिवसेना-शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सावंत यांना टोमणे मारले. वक्फ विधेयकाच्या निमित्ताने दोन्ही शिवसेनांमध्ये आरोप-प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केंद्र सरकारवर टीका केली. या विधेयकातून वक्फच्या मालमत्तांवर नियंत्रण मिळवण्याचा केंद्राचा हेतू असल्याचे दिसते. देशभरात वक्फ मंडळांकडे ९. ४ लाख एकर जमीन असून त्यांची अंदाजे किंमत १.०२ लाख कोटी रुपये इतकी आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकातून वक्फ मंडळांचे सशक्तीकरण केले जाणार आहे की या जमिनींवर केंद्राला ताबा मिळवायचा आहे, असा सवाल लंके यांनी केला.
राज्यांना अधिकार द्यावे- तेदेप
वक्फ बोर्डांची रचना ठरविताना तसेच कायद्यासाठी नियम तयार करताना केंद्राने राज्यांना अधिकार द्यावे अशी मागणी तेलुगू देसम पक्षाचे (तेदेप) खासदार कृष्णा प्रसाद टेनेट यांनी केली. मुस्लिम महिला, तरुण आणि दलितांच्या हितासाठी त्यांच्या संबंधित राज्यांमधील मंडळांच्या रचनेबाबत राज्य सरकारांना लवचिकता देण्याच्या सूचनेवर केंद्र सरकार विचार करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.या विधेयकाला बीजद, द्रमुकसह अन्य विरोधी पक्षांनीदेखीलविरोध दर्शवित केंद्र सरकारवर टीका केली.
अखिलेशशहा यांच्यात कलगीतुरा
विधेयकावरील चर्चेदरम्यान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात वादंग रंगला. भाषणादरम्यान यादव यांनी ‘‘देशातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष अद्याप आपला अध्यक्ष का निवडू शकलेला नाही,’’ असा सवाल यादव यांनी केला. त्यावर पक्षात घराणेशाही नसल्याने निर्णय घ्यायला वेळ लागतो, असा प्रतिटोला शहा यांनी लगावला.
हे विधेयक मुस्लिमांना न्याय देण्यासाठी आणलेले नाही. भाजपने ‘सौगात ए मोदी’ ही मोहीम सुरू केली आणि इथे ‘सौगात ए वक्फ’ आणले. वक्फ विधेयक मुस्लिमांसाठी कसे चांगले आहे याचा पाढा वाचला जात आहे. वक्फ मंडळात आता मुस्लिम सदस्यच अल्पसंख्य होतील. मुस्लिमेतर सदस्य कशासाठी?– अरविंद सावंत, खासदार, शिवसेना (ठाकरे)
विधेयकाच्या विरोधात भूमिका घेऊन मुस्लिमांना पाठिंबा देण्यासाठी सावंत यांनी हिरवे कपडे घातले आहेत का? ठाकरे गटाला हिंदुत्त्वाचीच नव्हे तर हिंदुंचीही अॅलर्जी होऊ लागली आहे. वक्फ मंडळातील भ्रष्टाचार संपण्यासाठी हे वक्फ विधेयक अत्यंत योग्य असून ते पारदर्शी आहे.– श्रीकांत शिंदे, खासदार, शिवसेना (ठाकरे)
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे पक्षाची दुटप्पी भूमिका समोर आली.सोयीचे राजकारण करणारे लोकांचा वक्फ बोर्ड विधेयकाचा हिंदुत्वाशी संबध नाही, असे जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होतो. या विधेयकामुळे मुस्लिम समाजाचा सर्वांगीण विकासाचा मार्ग खुला होईल.– एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री