तेलंगणामध्ये प्रजासत्ताक दिनी राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवज्ञा केल्याची घटना समोर आली आहे. तेलंगणात सलग दुसऱ्या वर्षी प्रजासत्ताक दिनाचा सार्वजनिक कार्यक्रम झाला नाही. राज्यपाल मिलसाई सुंदराजन यांनी राजभवनात राष्ट्रध्वज फडकावला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव गैरहजर होते. ते अन्य ठिकाणी पायाभरणीच्या कार्यक्रमाला गेले.
खरं तर, करोना महामारीमुळे तेलंगणा सरकारने सलग दुसऱ्या वर्षी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम राजभवनात घेण्याचे आवाहन केले होते. पण हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं. यावर उच्च न्यायालयाने सिकंदराबाद येथे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पूर्ण तयारीनिशी आयोजित करावा, असे निर्देश दिले होते. पण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिकंदराबाद येथे हा कार्यक्रम झाला नाही.
मुख्यमंत्री गैरहजर राहिल्याने राज्यपालांचा संताप
तेलंगणाच्या राज्यपाल मिलसाई सुंदरराजन यांनी मुख्यमंत्री केसीआर राजभवनातील कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी संविधानाचा अवमान केला, हे राज्याच्या इतिहासात लिहिलं जाईल.
यावर राज्यपाल म्हणाल्या की, “तेलंगणाने प्रजासत्ताक दिनाच्या उपक्रमाला कमी लेखलं आहे. येथे कोणताही सार्वजनिक कार्यक्रम पार पडला नाही. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात जाऊन मुख्यमंत्र्यांनी कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला नाही.” मी राजभवनातच ध्वजारोहण करावं आणि या कार्यक्रमाला लोकसहभाग नसावा, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा होती, असा आरोप राज्यपाल सुंदरराजन यांनी केला.
राज्यपाल पुढे म्हणाल्या, “तेलंगणाचे मुख्यमंत्री राजभवनातील कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी मला आशा होती. कारण दोन महिन्यांपूर्वी मी त्यांना पत्र लिहिलं होते की, यावेळी लोकसहभागाने कार्यक्रम भव्य पद्धतीने आयोजित करण्यात यावा. पण त्यांनी पत्राला उत्तर दिलं नाही. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी हा कार्यक्रम राजभवनात व्हावा, असे पत्र दिलं. त्या पत्रातही त्यांनी राजभवनातील कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचा उल्लेख केला नाही. हा सर्व प्रकार लोक बघत आहेत.”