नवी दिल्ली : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून काँग्रेससह विरोधी पक्षांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेविरोधात शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपचे अनेक नेते आक्रमक झाले. सेन्गोल राजदंडाबाबत भाजपच्या दाव्याला ‘बोगस’ ठरवणाऱ्या काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश यांच्या ट्वीटमुळे या वादात आणखी भर पडली.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सत्तांतराचे प्रतीक म्हणून ब्रिटिशांनी पं. जवाहरलाल नेहरूंच्या हाती सेन्गोल दिल्याचा कोणताही पुरावा नाही. माऊंटबॅटन, राजाजी आणि पं. नेहरू यांच्याशी संबंधित कोणतेही दस्तऐवज भाजपचा दावा सिद्ध करत नाहीत. भाजपचे सेन्गोलसंदर्भातील सर्व दावे खोटे (बोगस) असून ती काही लोकांची भ्रामक कल्पना आहे,’ असा शाब्दिक प्रहार रमेश यांनी केला.

‘सत्तांतरणाचे प्रतीक म्हणून ब्रिटिशांनी सेन्गोल राजदंड पं. नेहरूंच्या हाती दिला होता,’ असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पत्रकार परिषदेत केला होता. मात्र, सत्तेचे हस्तांतरण वगैरे सर्व दावे हे व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीतून मिळालेले ज्ञान असून त्याचा प्रसार भाजप करत आहे. शहांचा दावाच बोगस असून पंतप्रधान आणि त्यांचे अनुयायी तमिळनाडूमध्ये राजकीय फायदा मिळवण्यासाठी या राजदंडाचा गैरवापर करत आहेत, असा आरोपही रमेश यांनी केला.

त्यावर, अमित शहांनी दोन ट्वीट करून रमेश यांचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. आता काँग्रेसने आणखी एक लाजिरवाणा अपमान केला आहे. ‘तिरुवदुथुराई अधिनम’ या पवित्र शैव मठाने स्वत: देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी सेन्गोलचे महत्त्व सांगितले होते. काँग्रेस ‘अधिनम’चा इतिहास खोटा असल्याचा दावा करत आहे. वास्तविक, काँग्रेसने या वर्तनाचा पुनर्विचार करायला हवा, असे ट्वीट शहा यांनी केले. काँग्रेस पक्ष भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा इतका तिरस्कार का करतो? भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून तमिळनाडूतील पवित्र शैव मठाने पंडित नेहरूंना पवित्र सेन्गोल दिले होते; पण एखादी चालण्यासाठी वापरलेली काठी असावी असे समजूत करून घेऊन सेन्गोलची रवानगी संग्रहालयात केली गेली, असे दुसरे ट्वीट शहांनी केले.

काँग्रेससह अन्य भाजपेतर पक्षांच्या भूमिकेवर भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी तीव्र टीका केली. ट्वीटमध्ये ते म्हणाले की, संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्या बहुतांश पक्षांशी काय संबंध आहे? उत्तर सोपे आहे- ते घराणेशाही चालवणारे राजकीय पक्ष आहेत, ज्यांच्या राजेशाही पद्धती आपल्या राज्यघटनेतील प्रजासत्ताक आणि लोकशाहीच्या तत्त्वांशी परस्परविरोधी आहेत. हा संविधान निर्मात्यांचा अपमान असून या पक्षांनी आत्मपरीक्षण करावे!.. सामान्य कुटुंबातून आलेल्या विनम्र व्यक्तीवर देशाच्या जनतेने विश्वास ठेवला ही साधी बाबदेखील काँग्रेस आणि नेहरू-गांधी घराण्याला मान्य करता आलेली नाही. हे पक्ष देशापेक्षा राजकारणाला प्राधान्य देतात. पक्षपाती राजकारणाची शिक्षा पुन्हा भोगावी लागेल.

निदर्शकांना दिल्लीच्या वेशीवर अडवणार

राष्ट्रीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भूषण यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या कुस्तीगिरांनी रविवारी संसद भवनासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला असला तरी, खाप पंचायतींचे सदस्य, शेतकरी संघटनांना दिल्लीच्या वेशीवर अडवले जाणार असून हरियाणाच्या सीमेवर नाकाबंदी केली जाणार आहे. हे कुस्तीगीर गेले महिनाभर जंतर-मंतर येथे आंदोलन करत आहेत.

७५ रुपयांचे स्मृती नाणे

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या निमित्त केंद्र सरकारकडून  ७५ रुपये मूल्य असलेले विशेष स्मृती नाणे जारी केले जाणार आहे. अर्थ मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या वित्तीय व्यवहार खात्याने याविषयी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार, या नाण्याचे वजन ३४.६५ ते ३५.३५ ग्रॅम इतके असेल. नाण्याच्या एका बाजूला अशोकस्तंभावरील सिंह असेल, त्याच्या दोन्ही बाजूला देवनागरी लिपीमध्ये ‘भारत’ आणि रोमन लिपीमध्ये ‘इंडिया’ हे शब्द असतील. सिंहमुद्रेखाली रुपयाचे चिन्ह आणि ७५ मूल्य असेल. दुसऱ्या बाजूला संसद भवन संकुलाची प्रतिमा असेल आणि त्याखाली ‘२०२३’ आकडय़ांमध्ये लिहिलेले असेल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute over the scepter intense congress and opposition parties ysh