अंकिता देशकर, नागपूर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२१ मे रोजी रोजी मी पहिल्यांदा वाराणसीत उतरले. त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेथील प्रसिद्ध संकट मोचन हनुमान मंदिरात आरती करणार होते. सुरक्षेच्या दृष्टीने अर्धे रस्ते बंद होते. आमची राहण्याची व्यवस्था काशी विश्वनाथ मंदिर, द्वार क्रमांक ४ पासून थोड्या अंतरावर असलेल्या गोला गल्ली येथे होती. हा काशीचा दाट लोकसंख्या असलेला भाग. दुकाने, मोठमोठी घरे, त्यांची दारे सहज गल्लीत उघडतील अशी. प्रत्येक गल्लीत अनेक मंदिरांची गर्दी. अशाच एका गल्लीत नागपूरच्या भोसले राजांनी बांधलेले लक्ष्मी नारायण मंदिर देखील नजरेस पडले.

कुठे कुठे तर गल्ली इतकी अरुंद की एका वेळी एकच व्यक्ती चालू शकेल. आमचा पहिला दिवस मुक्कामाचा. दुसऱ्या दिवशी उठून आधी लोकांशी चर्चा सुरू केली. रोज सकाळी चौकात कुल्हड चहा पीत राजकारणावरचे लोकांचे मत ऐकायचे. ऐकता-ऐकता सभोवतालची निरीक्षणे टिपायची. या निरीक्षणात मला जे आढळले ते विचार करायला बाध्य करणारे होते. मोदी ज्या डिजिटल भारताचे सदैव गुणगान करीत असतात तो डिजिटल भारत या शिरात कुठेच दिसत नव्हता. छोट्या ठेलेवाल्यांना, रिक्षा चालवणाऱ्यांना, सामान उचलणाऱ्यांना रोकडच हवी असायची. रोकड जवळ नसल्याचे इतके दु:ख मला याआधी कधीच झाले नव्हते. येथील भैरव सरदार, जे जवळपास ७० वर्षांचे असतील. त्यांचे चौकात मिठाईचे दुकान आहे. मी येथे चहा घ्यायला गेले. या निमित्ताने चर्चा सुरू झाली. पुढे ती राजकारणावर गेली. सरदार म्हणाले, ‘‘मोदी जे काम करतायत ते एकदम बरोबर आहे. पण, महागाई खूप वाढली आहे. ती मध्यमवर्गीयांना परवडणारी नाही. हे लोक पाच किलो राशन देतो म्हणत आहेत. पण, पाच किलो कोणाच्या घरात पुरणार?’’ हा त्यांचा थेट प्रश्न.

सरदार यांची रजा घेऊन मी एका बाजारात पोहोचले. बऱ्याच दुकानदारांना मोदी, भाजपबद्दल विचारले. माझा प्रश्न होता, काय केले मोदींनी वाराणसीसाठी? सर्वांचे उत्तर एकच, ‘‘विश्वनाथ कॉरिडॉर’’. कारण, आता मंदिरात जाणे सोपे झाले आहे. काही वेळानंतर मात्र ही मंडळी जरा मोकळी बोलायला लागली. म्हणाली, ‘‘मोदी चांगले काम करत आहेत. पण, त्यांच्या हाताखाली काम करणारी माणसे काही कामाची नाहीत. बऱ्याच वेळा नाली स्वच्छ करण्याबाबत विनंती केली. पण, अद्याप काहीच हालचाल नाही’’. त्याच दुकानात बसलेले एक काका अचानक बोलायला लागले, ‘‘संपूर्ण विश्वात मोदींमुळेच भारताची ओळख आहे. इथले खासदार आहेत मोदी. जोपर्यंत ते काशीमध्ये आहेत. कोणताही दुसरा पक्ष जिंकू शकत नाही’’ दुसऱ्या दिवशी, विश्वनाथ मंदिराच्या शेजारच्या परिसरात गेले. काही लोकांसोबत संवाद साधला. एका आजोबा म्हणाले, ‘‘मी आता म्हातारा झालोय. पण तुम्ही माझ्या मुलासोबत बोला, त्याला आता जास्त कळते’’ त्यांचा २३ वर्षांचा मुलगा, दुकान सांभाळत होता. तो म्हणाला, ‘‘२०१९ साली मी १८ वर्षांचा झालो होतो. माझे मतदान यादीत नाव आले. मी काहीही विचार न करता कमळाला मत देऊन आलो. पण, यावेळी ती चूक नाही करणार. आता वकिलीचे शिक्षण घेतोय. फेब्रुवारीमध्ये समीक्षा अधिकाऱ्याची परीक्षा द्यायला दहा किलोमीटर सायकलवर प्रवास करून गेलो. घरी आल्यावर जेव्हा उत्तरे तपासण्यास सुरुवात केली तेव्हा कळले की पेपरच फुटला. अशी परिस्थिती असताना मी मत नाही देणार. यावेळी काँग्रेसकडून आशा आहे. त्यांनीही काम नाही केले तर पाच वर्षांनी पुन्हा मत बदलेल.’’ याच तरुणाचे पुढचे वाक्य होते, ‘‘नितीन गडकरी जर पंतप्रधान होणार असतील तर मी नक्की भाजपला मत देईल. त्यांनी खूप काम केलेय’’ काशीबद्दल बोलताना मात्र तो भावूक झाला, ‘‘काशीमध्ये आता शांतता नाही. काशीतला आनंद संपला आहे. आम्ही आधी जाऊन घाटावर बसायचो, आता नाही बसू शकत. बिरला भवन, जी वास्तू इतकी जुनी होती त्याला देखील यांनी तोडले. विकासाच्या नावावर विनाश ही चांगली गोष्ट नाही.’’

हेही वाचा >>>हरलो नाही, हरणार नाही! मोदींचे प्रतिपादन; सर्वसंमतीने निर्णय घेण्याची ग्वाही

आमचा हा संवाद ऐकणारे एकजण जरा रागानेच म्हणाले, ‘‘जर लोकांना आपल्या अडचणींबद्दल तक्रार करायची असेल तर कुठे करणार? तशी कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. फक्त मोठमोठ्या गोष्टी केल्या जातात. वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. इकडे ‘कारमाइकल’मध्ये १०० दुकानांचे अधिग्रहण केले. पैसे कोणालाच दिले नाहीत. आमच्याकडून जागा घेतात आणि विकतात. पण, त्यांना विचारले तर लगेच म्हणतील अरे, खूप पैसे दिले. गंगा नदीकडे यांचे अजिबात लक्ष नाही. १०० घाणेरडे नाले गंगा नदीमध्ये येऊन मिळतात. पण, ते बोलताना गंगा मेरी माँ है….असे म्हणतात.’’

वाराणसीमध्ये राजकारणावरचे लोकांची मते जाणून घेऊन सभोवतालची निरीक्षणे टिपत केलेला हा रिपोर्ताज. लोकांना पंतप्रधान मोदी, काँग्रेस आणि विकास याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न.

विकासकाम एकच – विश्वानाथ कॉरिडॉर

●सामान्य जनता असो किंवा भाजप कार्यकर्ते. सगळ्यांना येथील विकासकामांबद्दल विचारल्यास एकच उत्तर होते ते म्हणजे, विश्वनाथ कॉरिडॉर. मोदी काम करताहेत, मात्र त्यांच्या अधिनस्थ लोक काही काम करत नाहीत. आजूबाजूच्या परिसरातील मुस्लीम बांधवांसोबत बोलायचा बराच प्रयत्न केला. एक दोन मशिदी आणि दर्ग्यांपर्यंत जाऊन आले. पण, कोणीही कॅमेऱ्यावर बोलण्यास तयार नव्हते. महिलांनी गप्पा बऱ्याच मारल्या पण कॅमेऱ्यावर बोलण्यास त्यांनी साफ नकार दिला.

●काशी विश्वनाथ दर्शन, काल भैरव दर्शन, विशालाक्षी मंदिर, दशाश्वमेध घाटावरची गंगा आरती अनुभवतानाच तिथल्या लोकांचे त्रास उमगू लागले. तिथले तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत दिसले. बऱ्याच घरांमधील उच्चशिक्षित मंडळींनी आता वाराणसी सोडले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disturbing reality of varanasi amy