मॉडेल दिव्या पाहुजा हत्या प्रकरणात आता नवा खुलासा झाला आहे. गुरुग्राम पोलिसांच्या गुन्हे शाखेने नजफगढच्या मितरराऊं या ठिकाणी राहणाऱ्या मेघा नावाच्या तरुणीला अटक केली आहे. दिव्या पाहुजाची हत्या केल्यानंतर आरोपी अभिजितने मेघाला सिटी पॉईंट हॉटेलवर बोलवलं होतं. त्याच रात्री मेघाला बोलवण्यात आलं होतं ज्या रात्री दिव्या पाहुजाचा मृतदेह हॉटेलमध्ये होता.
पोलिसांनी काय म्हटलं आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेघाने आरोपी अभिजितला साथ देत दिव्याचा आयफोन, घटनास्थळी असलेलं पिस्तुल नष्ट करण्यासाठी अभिजितची मदत केली होती. मेघा नावाची ही तरुणी एका अॅपची संचालक आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. आज तकने हे वृत्त दिलं आहे.
मेघाने अभिजितला पुरावे नष्ट करण्यासाठी केली होती मदत
अॅपच्या माध्यमातूनच मेघा आणि अभिजितची ओळख झाल्याचंही कळतं आहे. अभिजितचं विलासी आयुष्य पाहून मेघावर त्याचा प्रभाव पडला. त्यानंतर या दोघांची आधी मैत्री झाली नंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार दिव्याची हत्या केल्यानंतर अभिजित सातत्याने मेघाशी बोलत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिजित आणि मेघा हे दोघे कधी कॉलवर तर व्हॉट्स अॅप कॉलवर बोलायचे. मेघा जेव्हा अभिजितचा फोन आल्यानंतर हॉटेल सिटी पॉईंट या ठिकाणी पोहचली होती तेव्हा दिव्या पाहुजाचा मृतदेह रुम नंबर १११ मध्ये होता. अभिजित तेव्हा घाबरला होता. त्याने मेघाला पैशांचं आमिष दाखवलं आणि दिव्याचा आयफोन आणि पिस्तुल हे पुरावे नष्ट करण्यास सांगितलं. त्यानंतर मेघाने आणि त्याने मिळून हे पुरावे नष्ट केले असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- मॉडेल दिव्या पाहुजा हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती सर्वात मोठा पुरावा, मात्र मृतदेह अद्यापही गायबच
दिव्याच्या हत्येनंतर मेघा हॉटेलमध्ये आली होती
मेघाच्या अटकेनंतर आता पोलिसांना या हत्येशी संबंधित सगळ्या घटनांची साखळी जोडण्यास मदत होणार आहे. २ जानेवारी या दिवशी गुरुग्राम या ठिकाणी असलेल्या हॉटेल सिटी पॉईंट या ठिकाणी मॉडेल दिव्या पाहुजाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणातल्या आऱोपींना अटक झाली आहे. तसंच मुख्य आरोपी अभिजितलाही अटक झाली आहे. ज्या कारमधून दिव्याचा मृतदेह नेण्यात आला होता ती कारही पोलिसांनी जप्त केली आहे. पण पोलिसांना अद्यापही मेघाचा मृतदेह सापडलेला नाही.
गुरुग्राम पोलिसांनी या हत्याकांडात सहभागी असलेल्या अभिजित सिंह, हेमराज आणि ओमप्रकाश या सगळ्यांना अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या सगळ्यांना अटक करण्यात आली आहे. आता पोलिसांनी अभिजितची गर्लफ्रेंड मेघालाही अटक केली आहे आणि तिचीही कसून चौकशी सुरु केली आहे. याआधी विशेष तपास समितीने अभिजितची चौकशी केली ज्यामध्ये पुरावे नष्ट करण्यासाठी दिव्या पाहुजाचा आयफोन, आयडी कार्ड, तसंच हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तुल हे दिल्लीतल्या रस्त्यांवर फेकलं होतं. आता पोलीस हे सगळं शोधते आहे. अशात मेघाने त्याला यासाठी मदत केली आहे असंही समजलं आहे ज्यानंतर तिलाही अटक करण्यात आली असून तिची चौकशी सुरु आहे.