कर्नाटकमधील काँग्रेस सरकार उलथवून लावण्यासाठी राजकीय विरोधकांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि माझ्याविरोधात काळ्या जादूचा प्रयोग करत शत्रू भैरवी यज्ञ केला असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केला. माध्यमांशी बोलत असताना शिवकुमार म्हणाले की, मी माझ्या मनगटावर पवित्र धागा बांधला आहे, वाईट नजरांपासून वाचण्यासाठीच हे कवच मी बांधले आहे. तसेच केरळच्या तांत्रिकांच्या मदतीने राजा राजेश्वरी मंदिराच्या नजीक एका निर्जन स्थळी काळ्या जादूचे विधी पार पाडले जात आहेत. या विधीमध्ये पशूंचाही बळी दिला गेला, असा दावा त्यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केरळचे तांत्रिक आमच्याविरोधात शत्रू भैरवी यज्ञ करत आहेत. मात्र आमची देवावर नितांत श्रद्धा असून लोकांचे आशीवार्द आमच्याबरोबर असल्यामुळे आमचा यापासून बचाव होईल, असा विश्वास आम्हाला वाटत आहे, असेही डीके शिवकुमार म्हणाले.

Donald Trump Convicted: …आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी डोळे मिटले; नेमकं काय घडलं अंतिम निकाल सुनावणीवेळी?

कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांनी पुढे सांगितले की, काळी जादू केली असल्याबाबत त्यांना खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. विरोधकांकडून अघोरी यज्ञ केला जात असून यामध्ये २१ बकऱ्या, तीन म्हशी, २१ काळ्या मेंढ्या आणि पाच डुकरांचा बळी दिला जात आहे. केरळच्या राज राजेश्वरी मंदिरानजीक शत्रू भैरवी यज्ञ केला जात आहे. शत्रूचा समूळ नाश करण्यासाठी या यज्ञात पंचबळी (पाच प्रकारचे बळी) देण्यात येत असतात.

उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी हा आरोप लावत असताना कुणाचेही नाव घेतले नाही. मात्र कर्नाटकमधील काही राजकीय व्यक्तींनी हे विधी केले असल्याचे म्हटले. “माध्यमांनी राजराजेश्वरी मंदिराजवळ पाहणी करावी, त्यांना सत्य समजून येईल”, असेही डीके शिवकुमार म्हणाले.

महिन्याभरानंतर भारतात परतलेल्या प्रज्वलला विमानतळावरच अटक, व्हिडिओतील आवाजाचे नमुने गोळा करणार?

डीके शिवकुमार पुढे म्हणाले की, २ जून रोजी आम्ही आमदारांची बैठक बोलावली आहे. विधानसभा, विधानपरिषदेचे सर्व आमदार आणि आमच्या खासदारांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत संघटनात्मक विषय आणि आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा केली जाईल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मुलगा डॉ. यतिंद्रने वडिलांसाठी आपला विधानसभा मतदारसंघ सोडला होता. त्याला विधानपरिषदेवर घेण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. तसेच आमच्या ज्या प्रमुख नेत्यांचा विधानसभेत पराभव झाला, त्यांनाही विधानपरिषेदवर घेण्याबाबत विचार केला जाणार आहे.

तुमचा अशा अंधश्रद्धांवर विश्वास आहे का? असा प्रश्न यावेळी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, विरोधकांचा आम्हाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न असला तरी आमचा ज्या शक्तीवर विश्वास आहे, ती शक्ती आमचे रक्षण करेल. त्यांना माझ्याविरोधात काहीही प्रयोग करू द्या. एक शक्ती आहे, जिच्यावर माझा विश्वास आहे, ती मला वाचवेल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dk shivakumar claims black magic being performed to topple karnataka government kvg