२२ जानेवारीला अयोध्येत श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यानिमित्त देशात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना २२ जानेवारीला मोदी सरकारनं अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. यासह अनेक राज्यांनीही सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. कर्नाटकातही २२ जानेवारील सुट्टी जाहीर करण्याची मागणी भाजापकडून केली जात होती. आता उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांनी भाजपाला प्रत्युत्तर देत सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आम्ही आमच्या भक्ती आणि धर्माचा प्रचार करणार नाही. आमचे मंत्री मंदिरात पूजा करतील. आम्ही सर्वांना प्रार्थना करण्यास सांगत आहोत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावात ‘राम’ आणि माझ्या नावात ‘शिव’ आहे. त्यामुळे आम्हाला कोणीही शिकवू नये अथवा आमच्यावर दबाव टाकू नये. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू,” असं डी.के शिवकुमार यांनी सांगितलं. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

माजी मंत्री सी.टी रवि यांनी सिद्धरामय्या यांच्यावर टीका केली आहे. “२२ जानेवारीला सुट्टी जाहीर करण्यासाठी सिद्धरामय्यांशी चर्चा केली. पण, सिद्धरामय्या भ्रमिष्ट झाले आहेत. ते काय करतात, हे त्यांनाही कळेना झालंय. सिद्धरामय्यांनी बाबरला सोडून श्री रामापशी यावं,” असा हल्लाबोल, सी.टी रवि यांनी केला आहे.

भाजपा खासदार तेजस्वी सुर्या यांनीही २२ जानेवारीला घोषित करण्याची मागणी केली होती. “कर्नाटक ही हनुमानाची भूमी आहे. त्यामुळे कर्नाटकचे अयोध्या आणि प्रभू श्री रामाशी विशेष असं नातं आहे. प्रभू श्री रामाची मूर्ती कर्नाटकातील एका मूर्तीकाराने बनवली आहे. कर्नाटकातील जनता हा सोहळा पाहण्यासाठी आतूर आहे. त्यामुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी,” अशी मागणी तेजस्वी सुर्यांनी कर्नाटक सरकारकडे केली होती.

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार अयोध्येतील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dk shivakumar on bjps call for holiday on jan 22 ayodhya ram temple ssa
Show comments