द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी आणि डीएमडीकेचे संस्थापक विजयकांत यांच्या भेटीमुळे तामिळनाडूमध्ये नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चेला उधाण आले आहे. या पाश्र्वभूमीवर, सत्तारूढ अभाअद्रमुकचा मुकाबला करण्यासाठी राजकीय पक्षांच्या आघाडय़ा होणे गरजेचे आहे, असे करुणानिधी यांनी सूचित केले आहे.
तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे विजयकांत यांची भेट ही नव्या राजकीय समीकरणांची नांदी आहे का, असे विचारले असता करुणानिधी म्हणाले की, या भेटीतून कोणता अर्थ काढावयाचा हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. मात्र आपल्याकडे घोषणा करण्यासारखे सध्या काहीच नाही, असे ते म्हणाले.
तथापि, तामिळनाडूतील राजकीय स्थितीचा विचार करता राजकीय पक्षांच्या आघाडय़ा होणे गरजेचे आहे. विविध राजकीय पक्षांच्या आघाडय़ांमुळेच राज्य वाचविता येणे शक्य आहे, असेही करुणानिधी म्हणाले.

Story img Loader