डिझेल नियंत्रणमुक्त करण्याच्या यूपीए सरकारच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करून द्रमुकने सबसिडीच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची मर्यादा १२ करण्याची मागणी केली आहे. स्वयंपाकाच्या गॅसबाबत गरीब जनतेचा रोष ओढवून घेऊ नका, असेही द्रमुकने म्हटले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दरवाढीवर टीका केली असून यूपीए सरकार गरिबांची पिळवणूक करणारे असल्याचे म्हटले आहे. बसपाच्या नेत्या मायावती यांनीही दरवाढीबाबत केंद्रावर टीका केली असली तरी सरकारला बाहेरून दिलेला पाठिंबा काढून घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तेल कंपन्यांना डिझेलच्या दरात वाढ करण्याचे अधिकार देणे हा अयोग्य निर्णय आहे, असे द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी म्हटले आहे. गरीब आणि मध्यमवर्गाला प्रतिलिटर ५० पैशांनीही डिझेलची दरवाढ परवडणारी नाही आणि त्यामुळे चलनफुगवटा वाढेल, असे करुणानिधी यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने डिझेलच्या दराबाबतच्या निर्णयाचा फेरविचार करावा, त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गाला त्याची झळ सोसावी लागणार नाही. सबसिडीच्या सिलिंडरची मर्यादा सहावरून नऊ करण्याच्या निर्णयाबाबत करुणानिधी म्हणाले की, संसदीय समितीने यापूर्वीच ही मर्यादा १२ करण्याची शिफारस केली आहे.
ममता बॅनर्जी कडाडल्या
केंद्रातील यूपीए सरकार गरिबांची पिळवणूक करणारे सरकार असून डिझेलच्या दरात आणखी वाढ करणे ही बाब खेदजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रेल्वे, पेट्रोल आणि आता डिझेलची दरवाढ यामुळे सर्वसामान्य माणूस दरवाढीच्या ओझ्याखाली दबला गेला आहे, असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
मायावतींचाही हल्लाबोल
दरवाढीवरून बसपाच्या नेत्या मायावती यांनी केंद्रावर हल्ला चढविला असला तरी सरकारला बाहेरून दिलेला पाठिंबा काढून घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यूपीए सरकारला त्यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये आणखी काही ‘चमत्कार’ करण्याची संधी आम्ही देत आहोत, असे त्या म्हणाल्या. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लोकसभा बरखास्त केली जाईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली. या टीकेवर काँग्रेसने मात्र मौन बाळगले आहे.

Story img Loader