तामिळनाडूतील सत्तारूढ अभाअद्रमुकने पैसा, बळ आणि शासकीय यंत्रणेच्या केलेल्या गैरवापरामुळेच लोकसभेच्या निवडणुकीत द्रमुकला राज्यात मोठा पराभव पत्करावा लागला, असा आरोप द्रमुकने सोमवारी केला.इतकेच नव्हे तर निवडणूक अधिकारी आणि सत्तारूढ पक्षाची मिलीभगत आणि निवडणूक आयोगाने घेतलेली पक्षपाती भूमिका यामुळेही द्रमुकला तामिळनाडूतील सर्वच्या सर्व म्हणजे ३९ मतदारसंघांत पराभव पत्करावा लागला, असा आरोपही द्रमुकचे नेते एम. करुणानिधी यांनी केला. पक्षाच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
द्रमुकची जिल्हा स्तरावर पुनर्रचना करून पक्षाचा कारभार अधिकाधिक परिणामकारक कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या त्रुटी होत्या आणि त्यावर कोणते उपाय आखता येतील, याबाबतही समिती शिफारस करणार आहे.
निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचा तक्रारी येऊनही निवडणूक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सत्तारूढ पक्षाला मतदारांना पैशांचे वाटप करणे शक्य झाले. पैशांच्या वाटपावर आम्ही पूर्ण नियंत्रण ठेवू शकलो नाही, असे नमूद करून मुख्य निवडणूक अधिकारी नक्राश्रू ढाळत असल्याचा आरोपही द्रमुकने केला आहे.
पक्षाच्या खराब कामगिरीची कारणे काय, हे शोधण्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडून आणि त्याच्या निवडणूक प्रतिनिधीकडून १५ जूनपर्यंत अहवाल मागविण्यात आला आहे आणि त्यानंतर पुढील पावले उचलण्यात येतील, असेही पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, एम. करुणानिधी यांनी नव्या तेलंगण राज्याचे पहिले मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे अभिनंदन करून, त्यांना आणि राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader