द्रविड मुनेत्र कळघमचे (डीएमके) नेते सैदाई सादिक यांनी भारतीय जनता पार्टीच्या चार महिला नेत्यांचा उल्लेख ‘आयटम’ असा केला आहे. संबंधित चारही महिला नेत्या पूर्वी अभिनेत्री होत्या, त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. हाच संदर्भ देत सादिक यांनी त्यांना ‘आयटम’ म्हटलं आहे. या प्रकारानंतर सैदाई सादिक यांनी माफी मागावी लागली.
नेमकं प्रकरण काय आहे?
डीएमके नेते सैदाई सादिक यांनी अलीकडेच तामिळनाडूमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपा नेत्या नमिता, खुशबू सुंदर, गौतमी आणि गायत्री रघुराम यांच्यावर निशाणा साधला. “संबंधित चारही महिला नेत्या आयटम आहेत. तामिळनाडूत कमळ फुलेल, असं खुशबू यांचं म्हणणं आहे. पण मला वाटतं, अमित शाहांच्या डोक्यावर केस उगवतील, पण तामिळनाडूत कमळ फुलण्याची शक्यता नाही.”
सादिक यांच्या विधानानंतर भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांनी ट्वीट करत डीएम नेत्यांवर निशाणा साधला. यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, ‘हे पुरुष जेव्हा महिलांबाबत अपशब्द वापरतात, यातून त्यांचं पालनपोषण कसं झालं आहे, हे दिसतं. स्वत:ला कलैग्नारचे अनुयायी मानणाऱ्या व्यक्तीने स्त्रीच्या गर्भाचा अपमान केला आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांचं हेच द्रविड मॉडेल आहे का?” असा सवाल खुशबू सुंदर यांनी विचारला. या ट्वीटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आणि डीएमके खासदार कनिमोझी यांनाही टॅग केलं.
या ट्वीटनंतर कनिमोझी यांनी डीएमके नेत्याच्या विधानाबाबत पक्षाच्या वतीने माफी मागितली. माफी मागताना कनिमोझी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं, “एक महिला आणि माणूस म्हणून मी माफी मागते. विधान करणारा नेता कोणत्याही पक्षाचा असो, अशा प्रकारचं विधान कदापि सहन करण्यासारखं नाही. त्यामुळे मी पक्षाच्या वतीने जाहीरपणे माफी मागते. कारण आमचे नेते एमके स्टॅलिन आणि आमचा पक्ष डीएमके अशा विधानाचा निषेध करतो.”
हेही वाचा- मुंबई: १६ वर्षीय मुलीला ‘आयटम’ म्हणणं तरुणाला पडलं महागात, कोर्टाने सुनावली दीड वर्षांची शिक्षा
कनिमोझी यांच्या ट्वीटनंतर डीएमके नेते सैदाई सादिक यांनीही माफी मागितली आहे. सादिक म्हणाले की, “खुशबू यांच्यासह कोणत्याही नेत्याला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. त्यामुळे विधानाबाबत मी माफी मागतो. मात्र, तामिळनाडूचे भाजपा प्रमुख अन्नामलाई यांनी द्रमुकच्या मंत्र्यांना डुक्कर आणि जनावर म्हटलं. तसेच पत्रकारांची तुलना माकडांशी केली. भाजपा नेत्याच्या या विधानावर कोणताच भाजपा नेता का बोलत नाही?” असा सवाल सादिक यांनी विचारला.