तमिळनाडूचे मंत्री आणि द्रमुक (DMK) पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी भाजपाप्रणीत केंद्र सरकारवर टीका केली. भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार असमान प्रमाणात निधीचे वाटप करत आहे. राज्यांकडून कराच्या स्वरुपात एक रुपयाचा महसूल केंद्राला जात असेल तर त्यातील फक्त २८ पैसे परत मिळतात, असा आरोप उदयनिधी स्टॅलिन यांनी केला.
तमिळनाडूमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उदयनिधी स्टॅलिन यांनी रामनाथपुरम आणि थेनी या दोन ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या असमान निधी वाटपावर कडाडून टीका केली. यापुढे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना २८ पैशांचा पंतप्रधान म्हणू, असेही ते म्हणाले. उदयनिधी हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच सुपुत्र आहेत. तसेच तमिळ सिनेसृष्टीत अभिनेते म्हणूनही त्यांची ओळख आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना भाजपाच्याच माजी नेत्याशी होणार; काँग्रेसची मोठी खेळी!
उदयनिधी स्टॅलिन हे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी भाजपा सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावरही टीका केली. हे धोरण तमिळनाडूमधील मुलांचे भविष्य उध्वस्त करेल, असे ते म्हणाले. केंद्राने तमिळनाडूचा निधी अडवला असून अनेक विकासाचे प्रकल्प रोखून धरले आहेत. तसेच तमिळनाडूमध्ये नीट परिक्षा बंद करू, असेही आवाहन उदयनिधी स्टॅलिन यांनी केले. यासाठी स्टॅलिन यांनी एम्स मदुराईचे उदाहरण दिले. भूमिपूजन केल्यानंतर या प्रकल्पाची एक वीटही रचली गेली नाही, असे ते म्हणाले.
तसेच जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हाच पंतप्रधानांचे पाय तमिळनाडूला लागतात. इतरवेळी ते तमिळनाडूकडे पाहतही नाहीत, अशीही टीका त्यांनी केली. तमिळनाडूमध्ये लोकसभेच्या ३९ जागा आहेत. १९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात या ३९ जागांसाठी मतदान पार पडेल.
सनातनवरील विधानामुळे वादात
मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी मागच्या काळात सनातन धर्मावर केलेल्या टीकेमुळे ते वादात अडकले होते. सनातन धर्म डेंग्यू, मलेरियासारखा असून त्याचे समूळ उच्चाटन करण्याची गरज असल्याचे उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते. यानंतर देशभरातून द्रमुक पक्षावर टीका केली गेली. तसेच मद्रास उच्च न्यायालयात या विधानाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयानेही या विधानावर तीव्र नापसंती व्यक्त केली.