Tamil Nadu Minister K Ponmudi vulgar joke on Tilaks: तमिळनाडूचे वनमंत्री आणि द्रमुक पक्षाचे वरिष्ठ नेते के. पोनमुडी यांनी हिंदू धर्मात कपाळावर लावल्या जाणाऱ्या टिळ्यासंदर्भात अश्लिल विधान करत त्याचा संबंध लैंगिक स्थितीशी जोडला होता. विशेष म्हणजे, एका जाहिर कार्यक्रमात महिलांसमोर त्यांनी हे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला, त्यानंतर आता त्यांची पक्षाच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
द्रमुक पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे सुपुत्र, उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी काही काळापूर्वी सनातन धर्मावर टीका केली होती. त्यामुळे द्रमुक पक्षावर देशभरातून टीका करण्यात आली. सनातन धर्माबाबतच वाद शमतो न शमतो तोच द्रमुक पक्षातील इतर काही नेत्यांनी धर्माशी संबंधित विषयावर यापूर्वीही वादग्रस्त विधाने केलेली आहेत. आता थेट मंत्र्यांनी जाहिररित्या हिंधू चालीरितीमध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या टिळ्यासंदर्भात नको ते विधान करून वाद ओढवून घेतला आहे.
के. पोनमुडी यांच्या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात ते म्हणतात, महिलांनी माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढू नये. हे आवाहन केल्यानंतर पोनमुडी पुढे एक विनोद सांगतात. ज्यात एक माणूस वैश्येकडे गेल्यानंतर त्याला शैव किंवा वैश्य असल्याची विचारणा केली जाते. मात्र सदर प्रश्न त्या पुरूषाला समजत नाही. यानंतर वैश्या त्याला कपाळावरील टिळ्याचा संदर्भ देऊन लैंगिक स्थितीची माहिती देते.
टिळ्याबाबत केलेला विनोद अश्लिल आणि बीभत्स असल्यामुळे त्यावर जोरदार टीका होऊ लागली. भाजपा आणि विरोधकांच्या टीकेसह स्वपक्षातूनही अनेकांनी या विधानावर नाराजी व्यक्त केली. द्रमुकच्या नेत्या आणि खासदोर कनिमोळी यांनीही एक्सवर पोस्ट शेअर करत या विधानाबद्दल जाहीर नाराजी उघड केली.

“मंत्री पोनमुडी यांचे अलीकडील विधान आक्षेपार्ह आणि अस्वीकार्य आहे. त्यांनी केलेल्या विधानाचे कारण काहीही असले तरी त्यांची भाषा असभ्य आणि निषेधार्ह होती”, अशी पोस्ट कनिमोळी यांनी केली आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री आणि भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांनीही एक्सवर मुख्यमंत्री स्टॅलिन यांना टॅग करत जळजळीत पोस्ट टाकली. त्या म्हणाल्या, “या मंत्र्याला खुर्चीवरून बाजूला करण्याची तुमच्यात हिंमत आहे का? तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला हिंदू धर्म आणि महिलांचा अपमान करण्यात आनंद मिळतो का?”
गायिका चिन्मयी श्रीपदा यांनीही पोनमुडी यांच्यावर टीका केली. विनोदाच्या नावाखाली अशा प्रकारची घाणेरडी विधाने मंत्री राजरोसपणे करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
के. पोनमुडी यांच्या या विधानानंतर टीका होऊ लागताच द्रमुकने तातडीने कारवाई करत त्यांना पक्षाच्या उपसरचिटणीस पदावरून मुक्त केले आहे. आता त्यांच्या जागी तिरुची एन शिवा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.