एखाद्या राजकीय नेत्याने आपल्या कार्यकर्त्याला दगडाने मारहाण करणे, ही कल्पनाही करवत नाही. पण ही घटना सत्यात उतरली आहे. तामिळनाडूमधील द्रविड मुन्नेत्र कळघमचे मंत्री एसएम नासर यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर दगड भिरकवला आहे.या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं. या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना तामिळनाडूमधील तिरुवल्लूर जिल्ह्यातील आहे. घटनेच्या वेळी मंत्री एसएम नासर एका कार्यक्रमस्थळाची पाहणी करत होते. दरम्यान, नासर यांना बसण्यासाठी खुर्ची हवी होती, पण कार्यकर्त्यांनी खुर्ची आणण्यासाठी विलंब केल्याने त्यांनी आपल्याच पक्षातील कार्यकर्त्याला दगड फेकून मारला आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेत कोणी जखमी झालं आहे का? याची कोणतीही माहिती अद्याप मिळू शकली नाही.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये सागर नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने “हा मंत्री आहे की शाळेतला पोरगा?” असा सवाल विचारला आहे.
खरंतर, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हे उद्या राज्यातील हिंदी लादण्याविरोधी आंदोलनादरम्यान मरण पावलेल्यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमस्थळाची पाहणी करण्यासाठी दुग्धविकास मंत्री एस. एम. नासर आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी खुर्ची आणण्यासाठी विलंब केल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना दगड फेकून मारला.