A Raja Controversy : द्रमुक पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. राजा यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेविरोधात दंड थोपटले आहेत. परंतु, भाजपाच्या राजकारणावर बोलताना ए. राजा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो. ए. राजा म्हणाले, भारत हे एक राष्ट्र नाही, ही गोष्ट सर्वांनी नीट समजून घ्या. भारत कधीच एक राष्ट्र नव्हतं. हे एक राष्ट्र नसून उपखंड आहे. तसेच तमिळनाडू हे राज्य भाजपाच्या ‘जय श्री राम’ आणि ‘भारत माता की जय’ या घोषणांभोवती फिरणाऱ्या विचारधारेचा कधीच स्वीकार करणार नाही.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पूत्र आणि राज्याचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माबाबतच्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी यांना फटकारलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी यांना खडे बोल सुनावल्यानंतर ए. राजा यांनी हे वक्तव्य केलं आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांशी केली होती. तसेच त्यांनी सनातन धर्माविषयी काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. यावरून सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की, तुम्ही तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केला आहे आणि आता तुम्ही याप्रकरणी न्यायालयाकडून दिलासा मागताय? तुम्ही सामान्य व्यक्ती नसून एक राजकारणी आहात.
सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधींना फटकारल्यानंतर भाजपा नेत्यांकडून उदयनिधी आणि द्रमुख पक्षावर टीका होत आहे. दरम्यान, द्रमुकचे नेते ए. राजा यांनी भाजपाच्या टीकेला उत्तर दिलं आहे. मदुराई येथील एका जनसभेला संबोधित करताना ए. राजा म्हणाले, जर भाजपावाले सांगत असतील की हा देव आहे आणि ही भारतमाता असून तुम्हाला ‘भारतमाता की जय’ बोलावं लागेल, ‘जय श्रीराम’ म्हणावं लागेल, तर आमचं तमिळनाडू भाजपाच्या या विचारधारेचा स्वीकार करणार नाही.
इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार ए. राजा म्हणाले, आमच्या तमिळ शिक्षकाने आम्हाला शिकवलं आहे की, राम सीतेबरोबर जंगलात गेला. त्याने जंगलात शिकार करून जगणं स्वीकारलं, त्याने सुग्रीव आणि विभीषण यांनादेखील भाऊ म्हणून स्वीकारलं. तिथे कुठेही जात किंवा पंथाला स्थान नव्हतं. मला राम किंवा रामायण माहिती नाही. माझा त्यावर विश्वास नाही.
हे ही वाचा >> प्राध्यापक साईबाबांसह इतर पाच जणांची निर्दोष मुक्तता; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निकाल!
ए. राजा म्हणाले, या उपखंडात वेगवेगळ्या भाषा, परंपरा आणि संस्कृती आहेत. तुम्ही तमिळनाडूला आलात तर तिथली वेगळी संस्कृती तुम्हाला पाहायला मिळेल. केरळमधील संस्कृती वेगळी आहे. दिल्लीत वेगळी संस्कृती आहे. ओडिशात वेगळी संस्कृती आहे. काश्मीरमध्ये एक वेगळी संस्कृती आहे, तुम्ही त्या संस्कृतींचा स्वीकार करा. मणिपूरमधील लोक श्वानाचं (कुत्रा) मांस खातात. तुम्ही ती गोष्टदेखील स्वीकारली पाहिजे. एखादा समाज गोमांस खात असेल तर त्यात तुम्हाला काही अडचण असण्याचं कारण नाही. त्या लोकांनी तुम्हाला गोमांस खायला सांगितलं आहे का? त्यामुळेच विविधतेत एकता असूनही आपल्यामध्ये मतभेद आहेत. परंतु, तुम्ही ते मतभेद स्वीकारले पाहिजेत.