संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी द्रविड मुन्नेत्र कळघम ( डीमके ) खासदार डी.एनव्ही सेंथिलकुमार एस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भाजपाची ताकद फक्त आम्ही गोमुत्र राज्य म्हणतो ती हिंदी राज्ये जिंकण्यापुरतीच आहे, असं सेंथिलकुमार एस यांनी म्हटलं. या विधानानंतर सेंथिलकुमार एस यांच्यावर सर्व स्तरातून टीकास्र डागलं जात आहे.
सेंथिलकुमार एस काय म्हणाले?
जम्मू-काश्मीरशी संबंधित दोन विधेयकांवरील चर्चेत सेंथिलकुमार एस यांनी भाग घेतला. तेव्हा बोलताना सेंथिलकुमार एस म्हणाले, “देशातील जनतेनं विचार केला पाहिजे की, भाजपाची ताकद फक्त हिंदी पट्ट्यातील राज्ये जिंकण्यापुरतीच आहे. ज्याला आम्ही गोमुत्र राज्ये म्हणून संबोधतो. तुम्ही ( भाजपा ) दक्षिण भारतात येऊ शकत नाही. तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकात काय झालं, हे सर्वांनी पाहिलंच आहे. आम्ही तिथे खूप मजबूत आहोत.”
एमडीएमके ( मारूमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम ) खासदार वायको यांनी सेंथिलकुमार एस यांच्या विधानाचं समर्थन केलं. “मी सेंथिलकुमार एस यांच्या विधानाशी सहमत आहे,” असं वायको यांनी सांगितलं.
भाजपा खासदार जगन्नाथ सरकार यांनी सेंथिलकुमार एस यांच्या वक्तव्यावर टीका केली. “भाजपाला देशाभरात स्विकारलं आहे. जो कुणी अशी वक्तव्य करत आहे, त्याला काहीच माहिती नाही. जनतेचा भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. पंतप्रधान मोदी हे फक्त भारतीय नाही तर जागतिक नेते बनले आहेत.”
काँग्रेस खासदार कार्ति पी. चिंदबरम यांनी सेंथिलकुमार एस यांच्या विधानाला असंसदीय म्हटलं आहे. “अत्यंत असंसदीय भाषा वापरण्यात आली. सेंथिलकुमार एस यांनी तातडीने माफी मागत विधान मागे घ्यावे,” असं कार्ति चिंदबरम म्हणाले.