“भाजपाचा विजय केवळ गोमुत्र राज्यातच झाला असून त्यांची ताकद हिंदी भाषिक राज्ये जिंकण्यापूरतीच आहे”, असे वक्तव्य थेट लोकसभेत करून द्रमुक पक्षाचे खासदार डी. एनव्ही सेंथिलकुमार यांनी खळबळ उडवून दिली होती. मंगळवारी (दि. ५ डिसेंबर) द्रविड मुन्नेत्र कळघम (डीमके) अर्थात द्रमुक पक्षाचे खासदार सेंथिलकुमार यांनी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात बोलत असताना सदर वक्तव्य केल्यानंतर भाजपाकडून जोरदार टीका करण्यात आली होती. या वक्तव्यावरून गदारोळ झाल्यानंतर आज सेंथिलकुमार यांनी आपले वक्तव्य मागे घेत असल्याची घोषणा केली आणि वादावर पडदा टाकला. “काल माझ्याकडून अनवधानाने एक विधान केले गेले, त्यामुळे लोकसभेतील काही सदस्य आणि देशातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे मी माझे वक्तव्य मागे घेत असून माझ्या भाषणातील ते शब्द पटलावरून काढून टाकावेत, त्याबद्दल मी क्षमा मागतो”, अशी भूमिका सेंथिलकुमार यांनी मांडली.
खासदार सेंथिलकुमार यांनी लोकसभेत आपली भूमिका मांडण्यापूर्वी एक्स या सोशल मीडियावरदेखील आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. “पाच राज्यातील निकालांबाबत लोकसभेत भाषण करत असताना माझ्याकडून चुकून काही नको ते शब्द बाहेर पडले. ते शब्द मी जाणूनबुजून वापरले नव्हते. त्या शब्दांमधून चुकीचा अर्थ गेल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे”, अशी पोस्ट सेंथिलकुमार यांनी ट्विटरवर टाकली आहे.
नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये मोठा विजय मिळाला. तर तेलंगणा आणि मिझोरम राज्यात भाजपाला फारसे यश मिळाले नाही. याचा संदर्भ देत असताना द्रमुकच्या खासदाराकडून आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले. खासदार सेंथिलकुमार यांच्या विधानानंतर भाजपाने जोरदार हल्लाबोल केला. द्रमुककडून सनातनी परंपरेचा अनादर केला जात आहे, तसेच त्यांच्याकडून ज्यापद्धतीची भाषा वापरली गेली, त्याबद्दल भाजपाने आक्षेप व्यक्त केला. फक्त भाजपाच नाही तर इंडिया आघाडीतील काँग्रेस पक्षाचे खासदार कार्ती चिदंबरम आणि राजीव शुक्ला यांनीही या विधानाचा निषेध केला.
हे वाचा >> VIDEO : “भाजपाची ताकद फक्त गोमुत्र राज्ये जिंकण्यापुरतीच,” द्रमुकच्या खासदाराचं वादग्रस्त विधान
द्रमुक पक्षाचे प्रमुख आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे सुपुत्र, कॅबिनेट मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी काही महिन्यांपूर्वी सनातन धर्मावर टीका केल्यानंतर देशभरात वाद उफाळला गेला होता. त्यानंतर द्रमुक पक्षाच्या खासदारानेच गोमुत्राबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून भाजपाला डिवचल्यामुळे भाजपाने ही संधी साधून द्रमुकवर जोरदार टीका केली.
सेंथिलकुमार यांच्या वक्तव्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांच्या भाषणातील चुकीचा शब्द काढून टाकला असल्याची घोषणा केली होती.
भाजपा खासदार रमेश बिधुरी यांचा अद्याप माफीनामा नाही
द्रमुक पक्षाच्या खासदाराने आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली असली तरी भाजपाचे खासदार रमेश बिधुरी यांनी अद्याप त्यांच्या आक्षेपार्ह विधानाबाबत माफी मागितलेली नाही. सप्टेंबर महिन्यात महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यासाठी घेतलेल्या विशेष अधिवेशनात रमेश बिधुरी यांनी बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांना उद्देशून अश्लाघ्य शिवीगाळ केली होती. त्याबाबत संसदेची समिती चौकशी करणार आहे. मात्र अद्याप बिधुरी यांनी मात्र सार्वजनिकरित्या दिलगिरी वक्त केलेली नाही.