डीएमकेचे खासदार टीकेएस एलंगोवन यांनी हिंदी अविकसित राज्यांची भाषा असल्याचं म्हटलं आहे. टीकेएस एलंगोवन यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भाषेचा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी जातीयवादी टिप्पणीदेखील केली असून हिंदी फक्त क्षुद्रांसाठी असल्याचं विधान केलं आहे.
टीकेएस एलंगोवन म्हणाले की, “फक्त बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसारख्या अविकसित राज्यांमध्ये हिंदी मातृभाषा आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाबकडे पहा. ही सर्व विकसित राज्यं नाहीत का? हिंदी या राज्यातील लोकांची मातृभाषा नाही”.
पुढे बोलताना त्यांनी हिंदी आपल्याला क्षुद्र बनवू शकते असंही म्हटलं आहे. “हिंदी आपल्याला क्षुद्र बनवेल. हिंदी आपल्यासाठी चांगली नाही,” असं विधान त्यांनी केलं आहे.
एप्रिलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत पार पडलेल्या संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत इंग्रजीला पर्याय म्हणून हिंदी भाषा स्वीकारली जावी, स्थानिक भाषा नाही असं वक्तव्य केलं होतं.