आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात पराभवाचा राग काढण्यापेक्षा सकारात्मक विचार करा. नकारात्मक वृत्तीला देशाने नाकारलं आहे हे निवडणूक निकालच सांगत आहेत. निवडणुकीतल्या पराभावाचा राग लोकसभेत काढू नका असं म्हणत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना टोला लगावला आहे. थोडा आपला मार्ग बदलून पाहा, विरोधासाठी विरोध करु नका. ज्या त्रुटी आहेत त्यावर चर्चा करा. हे अधिवेशन म्हणजे तुमच्यासाठी संधी आहे आता तरी ही संधी घ्या आणि देशाला सकारात्मकतेचा संदेश द्या. लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो, मौल्यवान असतो.
तुमच्या वृत्तीमुळे तुमच्याबद्दल देशात तिरस्कार निर्माण झाला आहे तुमच्याबद्दल त्याचं रुपांतर प्रेमात करायचं असेल तर नकारात्मकता सोडा असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला आहे. आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होतं आहे. त्या अनुषंगाने आज नव्या संसदेच्या बाहेरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
प्रत्येक समुदायाचे शेतकरी, देशाचे गरीब लोक या सगळ्यांचं बळ आपल्याला वाढवायचं आहे. त्यांच्या भविष्यासाठी आपल्याला चांगल्या योजना आणायच्या आहेत. विकासाच्या तत्वांना घेऊन जे पुढे जातात त्यांना पाठिंबा मिळतोच. जेव्हा चांगलं शासन आणि प्रशासन असतं तेव्हा अँटी इन्कंबन्सी हा शब्द निष्फळ ठरतो. आम्ही पारदर्शक काम करतो आहोत. तीन राज्यांमध्ये मिळालेला जनादेश उत्तम आहे. त्यानंतर आपण नव्या संसदेत अधिवेशन घेत आहोत. यावेळी दीर्घ काळासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये काम करता येणार आहे. आपलं सदन नवं आहे कदाचित व्यवस्थांमध्ये काही कमतरता असू शकतात. त्यावर सगळ्यांनी सूचना देणं आवश्यक आहे, काही त्रुटी असतील त्या जरुर लक्षात आणून द्या हे आवाहनही मोदी यांनी विरोधकांना केलं आहे.
देशाने नकारात्मकतेला नाकारलं आहे. मी हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला हे सांगू इच्छितो की आम्हाला सगळ्यांचीच साथ हवी आहे. विरोधकांशी चर्चाही झाली आहे. तुमच्या माध्यमातून मी सगळ्या खासदारांना हे सांगतो आहे की लोकशाहीचं हे मंदिर आहे. लोकांच्या अपेक्षा, स्वप्न यांसाठी आहे. विकसित भारतासाठीचं व्यासपीठ आहे. सगळ्या खासदारांनी जास्तीत जास्त तयारी करुन यावी. उत्तम सूचना तुम्ही द्या असं सांगू इच्छितो. मात्र चर्चाच होऊ दिली नाही तर या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात. नुकत्याच लागलेल्या निवडणुकांच्या निकालांचा आधार घेत मी विरोधकांना हे सांगू इच्छितो की हे अधिवेशन ही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या अधिवेशनात पराभवाचा राग काढण्याऐवजी, या पराभवातून धडा घेत मागच्या नऊ वर्षांची नकारत्मकता सोडली तर देश तुमच्याकडे नव्या दृष्टीने पाहू शकतो. सकारात्मक विचार घेऊन या तुमचं स्वागत आहे असंही मोदी यांनी म्हटलं आहे. निराश होऊ नका, मात्र बाहेरच्या पराभवाचा राग सदनात काढू नका.