नवी दिल्ली : शिख धर्मातील परंपरांची तुलना मुस्लिम धर्मातील रुढींशी करणे योग्य नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाबची सक्ती करण्याविरोधात दाखल याचिकांवर गुरुवारी युक्तिवाद झाला. यावेळी शिख धर्मातील पाच ‘क’ ही पुरातन परंपरा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांचे वकील निझाम पाशा यांनी शिखांच्या पगडीचा संदर्भ दिला. त्यावर न्यायमूर्तीनी वरील मत नोंदवले. सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांचे वकील देवदत्त कामत यांनी घटनेच्या अनुच्छेद २५चा हवाला दिला. ‘सामाजिक शांतता, नैतिकता आणि आरोग्य याला बाधा येत नाही, तोपर्यंत डोक्यावरून ओढणी घेण्यास अटकाव करता येणार नाही. अनुच्छेद १९ आणि २१ अनुसार डोके झाकणे हे धार्मिक मान्यतेला धरून आहे,’ असे कामत म्हणाले.

कर्नाटक सरकारने शाळांमध्ये हिजाबची सक्ती केली आहे. याविरोधातील सर्व याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.