भारतीय जवानांनी आणि सामान्य जनतेने सोशल मीडियावरील अफवांचे मेसेजेस फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. ते गुरूवारी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या भारतविरोधी अपप्रचारावर चिंता व्यक्त केली. सोशल मीडियावर भारताच्या शत्रूंकडून अफवा पसरवल्या जात आहेत. काहीवेळा भारतीय सैन्यातील जवान आणि अधिकारीही कोणतीही खातरजमा न करता व्हॉटसअॅप किंवा फेसबुकवर हे मेसेजेस फॉरवर्ड करतात. त्यामुळे किमान तुम्हीतरी देशाचा विचार करून खातरजमा केल्याशिवाय अशाप्रकारचे मेसेजेस फॉरवर्ड करू नका, असे आवाहन मी करतो. मी तुम्हाला हे सांगत आहे कारण तुमच्यावर केवळ सीमेवरच्या सुरक्षेचीच जबाबदारी नाही. तर तुमच्यावर देशाची एकात्मता आणि अखंडता कायम राखण्याचीही जबाबदारी आहे, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. तसेच भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानमधून होणारी घुसखोरी कमी झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. तसेच सीमारेषेवर सीमा सुरक्षा दल, गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षाव्यवस्था प्रस्थापित आमचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा