व्हीलचेअरवरील व्यक्तीला फाशी देण्यावरून वाद
पाकिस्तानातील तुरूंगात असलेला माझा मुलगा अब्दुल बसीत याची सुटका करण्यात यावी, अशी मागणी त्याची आई नुसरत परवीन हिने केली आहे. देशाच्या अध्यक्षांनी मुलाला क्षमा करावी असेही तिने म्हटले आहे.
अध्यक्ष महमूद हुसेन यांनी जानेवारीत बसित याला फाशी देण्यात येऊ नये असा आदेश फाशीच्या काही तास आधी दिला होता व फाशीच्या आदेशाची मुदत संपली आहे. बसित याची आई नुसरत हिने फैसलाबाद येथील तुरूंगात त्याची भेट घेतली होती. तिने सांगितले की, माझ्या मुलाला पक्षाघात झाला असून त्याचे वजन घटून केवळ सांगाडा उरला आहे. त्यामुळे त्याला भेटले तेव्हा मी खूप रडले, माझा मुलगा जवळपास मेल्यासारखाच आहे. त्यांना आता मेलेल्या व्यक्तीला फाशी द्यायचे आहे काय. बसित यांचे अंग कमरेपासून लुळे पडले असून आर्थिक कारणास्तव एका व्यक्तीचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर होता व २००९ पासून तो फाशीच्या रांगेत आहे. बसित याला फाशी देण्यासाठी नव्याने आदेश मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तुरूंग अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, बसितला फाशी देण्यासाठी तुरूंगातील नियमांचे पालन करावे लागेल, पण त्यात व्हीलचेअरवर असलेल्या माणसाला फाशी देण्याची तरतूद नाही. रिप्रीव्ह या फाशीविरोधी स्वयंसेवी संस्थेच्या संचालक माया फोआ यांनी सांगितले की, पाकिस्तानी अधिकारी बसित याला फाशी देण्यासाठी पुन्हा तयारी करीत आहेत याचे आश्चर्य वाटते. व्हीलचेअरवरील व्यक्तीला फाशी देणे भयानक असून सरकारने त्यावर स्पष्टीकरण दिलेले नाही. अध्यक्ष ममनून हुसेन यांनी बसित याची फाशी रद्द करावी यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने दबाव आणण्याची गरज आहे.