रशियाने २४ फेब्रुवारी रोजी पूर्ण सैन्यबळासह युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष कायम आहे. तर, ब्रिटन आणि अमेरिका या रशियाला या युद्धाच्या गंभीर परिणामांचा इशारा देत आहेत. परंतु या हल्ल्यासाठी आंतरराष्ट्रीय निषेध आणि निर्बंधांकडे दुर्लक्ष करून, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इतर देशांना इशारा दिला की, “रशियाच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास त्यांनी यापूर्वी कधीही पाहिले नाही, असे परिणाम होतील. अमेरिकेने युक्रेनवरील रशियन हल्ल्यात हस्तक्षेप करू नये, अन्यथा त्यांनाही भयंकर परिणाम भोगावे लागतील,” असंही पुतिन यांनी म्हटलंय.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, रशियन लष्कर युक्रेनच्या महत्त्वाच्या लष्करी तळांना निवडकपणे लक्ष्य करून युक्रेनच्या लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहे. रशियाच्या निशाण्यावर युक्रेनची पायाभूत सुविधा, हवाई संरक्षण सुविधा, लष्करी हवाई क्षेत्रे आहेत. दरम्यान, रशियन सैन्याकडून युक्रेनची राजधानी किव्ह आणि खार्कीव्ह शहरावर जोरदार हल्ले सुरू आहेत. दोन्ही देशांमधील या संघर्षात आतापर्यंत हजारो सैनिकांना आणि निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, आज रशियाने खार्कीव्ह शहरावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आज सकाळी खार्कीव्हवर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याचं सांगितलंय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंधम बागची यांची ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिलीय. दोन ट्विट करत त्यांनी याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी, “अत्यंत दु:खाने आम्ही या वृत्ताला दुजोरा देत आहोत की एका भारतीय विद्यार्थ्याचा खार्कीव्ह येथे आज सकाळी झालेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झालाय. परराष्ट्र मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे,” असं म्हटलंय.