ईदच्या दिवशी हिंदूंसाठी मातेसमान असणाऱ्या गायींचा बळी देऊ नका, असं आवाहन AIUDF चे सर्वेसर्वा आणि आसाम राज्य जमीयत उलामाचे अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांनी केलं आहे. अजमल यांच्या या विधानानंतर सोशल मीडियात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी त्यांच्या विधानाला पाठिंबा दर्शवला आहे.
माध्यमांशी बोलताना अजमल म्हणाले की, “देशात बहुसंख्य सनातन धर्म आहे. त्यामुळे इस्लाम धर्माचं पालन करणाऱ्यांनी ईदच्या दिवशी गायींचा बळी देऊन सनातन धर्मियांच्या भावना दुखवू नये. ईदच्या दिवशी कुर्बानी देण्यासाठी गायीचा बळी देणं अनिवार्य नाही. देशातील बहुतांशी आपले बांधव हे सनातन किंवा हिंदू धर्मातील आहेत. ते गायीला आपल्या मातेसमान मानतात, त्यामुळे मुस्लिमांनी गायींचा बळी कशासाठी द्यायचा? ईदीला मुस्लिमांनी गायींचा बळी देऊ नये,” असं आवाहन बद्रुद्दीन अजमल यांनी केलं आहे.
धुबरी येथील लोकसभा खासदार यांनी रविवारी सांगितलं की, “इस्लाममध्ये, कीटक, कुत्रा किंवा मांजर यांना वेदना देण्यास देखील परवानगी नाही. कोणी मांजर किंवा कुत्र्याला हानी पोहोचवत असेल तर त्याला स्वर्गात स्थान मिळत नाही.” याशिवाय अजमल यांच्या विधानाबाबत बोलताना आसाम पीसीसीचे अध्यक्ष भूपेन कुमार बोराह म्हणाले की, “बद्रुद्दीन अजमल हे एक राजकीय नेता असण्यासोबतच ते मौलाना देखील आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाचा बारकाईने अभ्यास करून गोहत्या न करण्याचं आवाहन केलं असावं. ”