उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे योगी आदित्यनाथ परत सत्तेवर आले असून मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालंय. अशातच भाजपाचे अनेक आमदार या निवडणुकीत पुन्हा निवडून आले आहेत. लोणीमधील आमदार नंदकिशोर गुर्जर हे देखील पुन्हा निवडून आले आहेत. गुर्जर त्यांच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. यावेळीही त्यांनी आमदार होताच वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
निवडणूक जिंकल्यानंतर नंदकिशोर गुर्जर यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नंदकिशोर यांनी निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार व्यक्त केले. यासोबतच त्यांनी येत्या पाच वर्षांत काय करणार, हे देखील सांगितलं. पण परवानगीशिवाय लोणीत एकही मांसाचे दुकान किंवा हॉटेल उघडणार नाही, असा इशाराही दिला.
लोणीतील मांसविक्रीची दुकाने तात्काळ बंद करा, असा अप्रत्यक्ष इशारा आमदारांनी दिला. ओयो हॉटेल, अमली पदार्थांचा धंदा, गैरप्रकार होऊ नयेत, लोकांना अभिमान वाटावा अशी कायदा व सुव्यवस्था असावी. कायदा व सुव्यवस्था गेल्या पाच वर्षांत जशी होती तशीच राहिली पाहिजे, असेही ते म्हणाले. तसेच काही अधिकारी बदनामी करण्याचं काम करतात, मात्र त्यांनी सावध राहावे, असा इशारा देत लोणीचं लंडन करू, असंही ते म्हणाले.
दरम्यान, लोणीतील भूमाफियांवर कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व माफिया, गैरकारभार करणारे आणि पालिकेची लूट करणाऱ्यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली आहे. लोकांनी त्याला नाकारले आहे, असं ते म्हणाले.