संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्यासाठी सर्वच सदस्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी सांगितले. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सातत्याने विविध मुद्द्यांवरून तहकूब होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुखर्जी यांच्या या विधानाला महत्त्व प्राप्त झाले.
संसदेचे व्यासपीठ चर्चेसाठी आणि निर्णयासाठी वापरले गेले पाहिजे. केवळ गोंधळ घालण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ नये, याचीही आठवण मुखर्जी यांनी करून दिली.
दरम्यान, मुखर्जी यांच्या या भाषणानंतरही वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत काही सदस्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज सोमवारी सकाळी दहा मिनिटांसाठी आणि लोकसभेचे कामकाज सुरुवातीला एक तासासाठी तहकूब करण्यात आले.
गेल्या बुधवारी संसदेचे कामकाज सुरू झाल्यापासून सातत्याने तहकूब करावे लागते आहे. वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून आंध्र प्रदेशमधील सदस्यांनी दोन्ही सभागृहात घोषणाबाजी आणि गोंधळ घालण्याचे प्रकार सुरूच ठेवल्यामुळे कामकाज तहकूब करावे लागते आहे. येत्या २१ फेब्रुवारीला संसदेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब होण्यापूर्वी वेगळ्या तेलंगणाचे विधेयक संसदेमध्ये मांडले जाईल, यावर केंद्र सरकार ठाम आहे.