अखिल भारतीय बार परीक्षेचा कट-ऑफ कमी करण्याची मागणी करणारी याचिका रद्द करत सर्वोच न्यायालयाच्या न्यायधीशांनी वकिलीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलेच फटकारलं आहे. कट-ऑफ कमी करण्याची मागणी केल्यापेक्षा अभ्यास करा, असं ते म्हणाले. तसेच या परीक्षेचा कट-ऑफ कमी केल्यास त्याचा परिणाम वकिलांच्या क्षमतेवर होईल, अशी टीप्पणीही त्यांनी केली.

हेही वाचा – IAS पूजा खेडकरचा आणखी एक प्रताप समोर; दिव्यांग असल्याचे सांगून UPSC परीक्षेत मिळवली सूट

नुकताच झालेल्या अखिल भारतीय बार परीक्षेचा कट-ऑफ कमी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सरन्यायधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. यावेळी सरन्यायधीशांनी याचिका करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलचं सुनावलं.

सामान्य प्रवर्गासाठी ४५ गुण, तर एससी-एसटी प्रवर्गासाठी ४० गुणांचा कट-ऑफ निश्चित करण्यात आला आहे. असे असतानाही तुम्ही कट-ऑफ ४० गुणांवरून ३५ गुणांवर आणण्याची मागणी करत आहात, जर तुम्ही या परीक्षेत ४० गुणही मिळवू शकत नसाल, तर तुम्ही वकील कसे होणार? त्यामुळे कट-ऑफ कमी करण्याची मागणी केल्यापेक्षा अभ्यास करा, असं सरन्यायाधीश म्हणाले. तसेच अखिल भारतीय बार परीक्षेचा कट-ऑफ कमी केल्यास त्याचा परिणाम वकिलांच्या क्षमतेवर होईल, अशी टीप्पणीही त्यांनी केली.

हेही वाचा – प्रेमसंबंधाला विरोध केला म्हणून १५ वर्षांच्या मुलाने आई-वडीलांसह भावाचा केला खून…

अखिल भारतीय बार परीक्षा काय आहे?

अखिल भारतीय बार परीक्षा ही बार कॉन्सिल ऑफ इंडियाद्वारे आयोजित केली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच वकीलीची सनद मिळते. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा १० भाषांमध्ये घेतली जाते. विशेष म्हणजे या परीक्षेत बसण्यासाठी कोणताही वयाची अट नसते. कोणत्या वयाची व्यक्ती ही परीक्षा देऊ शकते.