दिवसा मतदारसंघातील लोकांना व कार्यकर्त्यांना भेटणे, दुपारी अन्य भागांमध्ये प्रचारसभा, मग पुन्हा संध्याकाळी मतदारसंघात परतल्यावर तीन सभा घेणे, प्रचाराच्या काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा दिनक्रम होता. आता १४ एप्रिल पासून गडकरी यांचे परराज्यातील दौरे सुरु होणार आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत असून काँग्रेसकडून नाना पटोले रिंगणात उतरल्याने रंगत आली आहे. या निवडणुकीत नऊ दिवस गडकरी आणि त्यांची टीम दिवसरात्र झटत होती.
कोण होते टीम गडकरीत
नितीन गडकरी हे भाजपाचे स्टार प्रचारक असल्याने त्यांनी अन्य मतदारसंघातही सभांसाठी जाणे अपेक्षित होते. अशा वेळी गडकरींची एक टीमच मतदारसंघात कामात लागली होती. संजय देऊगावकर, संजय भेंडे, आमदार सुधाकर देशमुख, संदीप जोशी, प्रवीण दटके, सुधाकर कोहळे, गिरीश व्यास अशी अनेक मंडळी दिवसरात्र मेहनत करत होती. प्रत्येकाने जबाबदारी वाटून घेतली होती. इतकच नव्हे तर बाहेरच्या राज्यातील नितीन गडकरी यांचे समर्थकही प्रचारासाठी स्वेच्छेने नागपूरमध्ये आल्याचे भाजपाचे स्थानिक नेते सांगतात. या समर्थकांनी मतदारांची माहिती गोळा करण्याच्या कामात मोलाचे योगदान दिल्याचे संजय देऊगावकर सांगतात. तर संदीप जाधव यांनी विविध समाजाच्या बैठकीचे आयोजन केल्याचेही त्यांनी नमूद केले.
कसे होते नियोजन ?
नितीन गडकरी हे अखेरचे नऊ दिवस सकाळी आणि संध्याकाळी स्वत:च्या मतदारसंघात आणि दुपारच्या वेळी बाहेरच्या मतदारसंघात सभा घ्यायचे. सकाळी आठ वाजता गडकरींचा भेटीगाठींचा कार्यक्रम सुरु व्हायचा. माध्यमांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते या सर्व मंडळींना गडकरी सकाळी आठनंतर भेटायचे. यानंतर सकाळी १० ते दुपारी एक वाजेपर्यंत ते मतदारसंघातील रॅली किंवा पदयात्रेत सहभागी व्हायचे. दुपारी जेवणांनंतर दोन वाजता गडकरी अन्य मतदारंसघांमध्ये प्रचारसभा घेण्यासाठी हेलिकॉप्टरने रवाना व्हायचे. साधारणत: पाच वाजेपर्यंत गडकरी बाहेरच्या मतदारसंघांमध्ये असायचे. तिथून परतल्यावर संध्याकाळी सात वाजता गडकरी पुन्हा मतदारसंघात सभा घ्यायचे. दररोज तीन सभा घेण्यावर त्यांनी भर दिला. गडकरींनी मतदारसंघात एकूण २४ सभा घेतल्याचे सांगितले जाते. सभा संपल्यानंतर गडकरी घरी यायचे आणि मग रात्री विविध ठिकाणावरुन आलेल्या नेते व कार्य़कत्यांची भेट घ्यायचे.
गडकरींच्या प्रचारात सहभागी झालेले नेते
नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी सुषमा स्वराज (२ मेळावे), उमा भारती ( २ जाहीरसभा, एक मेळावा) हे नेते नागपूरमध्ये आले होते. तर प्रचाराची सांगता अमित शाह यांच्या सभेने झाली.
कुटुंब रमले प्रचारात
नितीन गडकरी यांची मुले राजकारणात फारशी सक्रीय नाहीत. मात्र, प्रचारात संपूर्ण कुटुंबीय व्यस्त असल्याचे या निमित्ताने दिसून आले. गडकरी यांची पत्नी. सून आणि मुले यांनी देखील प्रचारात सहभाग घेतल्याचे सूत्रांकडून समजते.