आयआयटी कानपूर महाविद्यालयाला तब्बल १०० कोटींची देणगी मिळाली आहे. प्रथमच एका माजी विद्यार्थ्याने एखाद्या महाविद्यालयाला एवढी मोठी आर्थिक मदत केली आहे. हा निधी स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीसाठी वापरला जाणार असून आयआयटी कानपूरमध्ये यासाठी एक इमारत तयार केली जात आहे. इतकी मोठी रक्कम देणाऱ्या या माजी विद्यार्थ्यांचे नाव आहे राकेश गंगवाल.
आयआयटी कानपूरचे संचालक अभय करंदीकर यांनी सोमवारी मुंबईत गंगवाल यांची भेट घेतली, जिथे गंगवाल यांनी त्यांच्या पूर्वीच्या महाविद्यालयासाठी १०० कोटींची देणगी जाहीर केली. आयआयटी कानपूर या प्रकल्पासाठी निधी उभारत आहे, ज्यासाठी ६०० कोटी खर्च येणार आहे. योजनेनुसार, या नवीन संस्थेमध्ये एकूण ९ प्रगत संशोधन केंद्रे बांधली जातील.
आयआयटी कानपूर या उपक्रमाद्वारे वैद्यकशास्त्राला अभियांत्रिकीसह एकत्रित करण्याचा आणि क्रॉस-डिसिप्लिनरी लर्निंगला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. शाळा आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे क्षेत्रफळ सुमारे दहा लाख चौरस फूट असेल. या प्रकल्पाचा पहिला टप्पा तीन ते पाच वर्षांत पूर्ण होईल.
Photos : आर्थिक गुंतवणुकीसाठी ‘हे’ आहेत सर्वोत्तम पर्याय; जाणून घ्या अधिक तपशील
या वैद्यकीय संस्थेचे नाव गंगवाल स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी असेल. याप्रसंगी गंगवाल आपल्या संपूर्ण कुटुंबासह मुंबईत पोहोचले होते. यावेळी ते म्हणाले, “विविध क्षेत्रात हजारो नेते घडवणारी संस्था आता आरोग्य सेवा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील आहे हे पाहून मला अभिमान वाटतो. ही संस्था आरोग्य सेवेत नवीन उंची गाठेल.”
आयआयटी कानपूरला देणगी देणारे राकेश गंगवाल कोण आहेत?
आयआयटी कानपूरला एवढी मोठी देणगी देणारे राकेश गंगवाल हे इंडिगो एअरलाइन्सचे सह-संस्थापक आहेत. १९५३ मध्ये जन्मलेल्या राकेश गंगवाल यांचे शालेय शिक्षण डॉन बॉस्को, कोलकाता येथे झाले. त्यानंतर त्यांनी १९७५ मध्ये आयआयटी कानपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून त्यांनी एमबीएची पदवी देखील घेतली आहे. इंडिगोमध्ये त्यांची ३७ टक्के भागीदारी आहे. आता ते अमेरिकेत राहतात. २०२० साली, फोर्ब्स ४०० च्या अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांना ३५९ व्या क्रमांकावर ठेवण्यात आले होते.