रुग्णावर अयोग्य उपचार करणाऱ्या चंडिगढस्थित डॉक्टरने हलगर्जीपणा केल्याची जबरी शिक्षा आधी रुग्णाला भोगावी लागली आणि त्यानंतर ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे या रुग्णाने धाव घेतल्यामुळे आता संबंधित डॉक्टरला तब्बल ७० लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागली.
शालेय विद्यार्थी असलेल्या अभिषेक अहलुवालिया याच्यावर उपचार करताना त्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळे तसेच या दुर्लक्षामुळे अभिषेकला स्वत:चा पाय गमवावा लागल्यामुळे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. सलुजा यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. आपल्या मुलाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी तसेच इतरांवर उपचार करताना संबंधित डॉक्टरवर चाप बसावा यासाठी त्या दुर्दैवी मुलाच्या आईने ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली.
मात्र चंडिगढ तक्रार निवारण मंचाने नुकसानभरपाई देण्याची गरज नसल्याचा निर्णय दिला. त्याविरोधात त्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे अपील केले. त्यांनी डॉ. सलुजा यांनाच याप्रकरणी दोषी ठरवत त्यांना ७० लाख रुपयांचा दंड ठोठावला.
नेमके काय झाले?
११ जुलै २००३ रोजी अभिषेक अहलुवालिया हा मुलगा शाळेत खेळत असताना त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्या वेळी अभिषेकच्या आई अनुराधा यांनी त्याला डॉ. संजय सलुजा यांच्याकडे नेले. त्यांनी अभिषेकला चंडिगढमधील इन्स्कॉल रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले. तेथे अभिषेकवर त्यांनी शस्त्रक्रियाही केली. मात्र पायाला प्लॅस्टर घातल्यानंतर त्याच्या पायाच्या रक्तवाहिन्या निष्क्रिय होत गेल्या आणि पायाच्या स्नायूंचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले. वारंवार तक्रारी करूनही डॉ. सलुजा आणि रुग्णालयाने अभिषेकच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. जेव्हा अभिषेकच्या पोटात दुखण्यास व श्वसनात अडथळे येण्यास सुरुवात झाली तेव्हा डॉ. सलुजा यांनी त्याला दुसऱ्या डॉक्टरांना दाखवा असे सांगितले. शासकीय रुग्णालयात दाखल केलेल्या अभिषेकच्या हृदय, फुप्फुसे आणि मूत्रपिंड आदी इंद्रियांवर परीणाम होत तो कोमात गेला. व ढोपरापासून त्याचा पाय कापावा लागला.

Story img Loader