इस्रायलने गाझात केलेल्या हवाई हल्ल्यात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अल शिफा रुग्णालयातच थांबलेल्या डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. याबाबत ‘डेमॉक्रसी नाऊ’ या वृत्तपत्राने वृत्त दिलं आहे. हम्माम अल्लोह असं या डॉक्टरांचं नाव आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी रुग्णालय सोडण्याच्या इस्रायलच्या आदेशांना विरोध केला होता. तसेच मी निघून गेलो, तर माझ्या रुग्णांवर कोण उपचार करेन, असा प्रश्न विचारला होता.
या मुलाखतीत डॉ. अल्लोह म्हणाले होते, “जर मी रुग्णालय सोडून गेलो, तर माझ्या रुग्णांवर कोण उपचार करेन? ती काही जनावरं नाहीत. योग्य वैद्यकीय उपचार मिळणं त्यांचाही अधिकार आहे. मी माझ्या रुग्णांचा विचार न करता केवळ माझ्या जीवाचा विचार करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण घेतलं नाही.”
हल्ल्यात डॉ. अल्लोह यांच्यासह त्यांचे वडील, सासरे, मेहुणा यांचाही मृत्यू
या हल्ल्यात मृत्यू झालेल्या डॉ. अल्लोह यांचे सहकारी डॉक्टर बेन थॉमसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात डॉ. अल्लोह यांच्यासह त्यांचे वडील, सासरे, मेहुणा यांचाही मृत्यू झाला. इस्रायलचा हल्ला झाला तेव्हा अल्लोह त्यांच्या सासरी होते. अल्लोह यांच्या पश्चात आता त्यांची पत्नी आणि दोन मुलं आहेत. दोन्ही मुलांचं वय अनुक्रमे ४ वर्षे आणि ५ वर्षे आहे.
हेही वाचा : हमास दहशतवादी संघटना आहे की नाही? ‘तो’ व्हिडीओ पोस्ट करत इंग्लंडचे नवे गृहमंत्री म्हणाले, “मी…”
आरोग्य सेवेअभावी अल शिफा रुग्णालयात तीन चिमुरड्यांचा मृत्यू
रविवारी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, गाझातील सर्वात मोठं रुग्णालय असलेल्या अल शिफा रुग्णालयाचं काम पूर्णपणे ठप्प झालं. इस्रायलचे हवाई हल्ले होत असताना या रुग्णालयातील रुग्णांचा सातत्याने मृत्यू होत आहे. हमासच्या आरोग्य विभागाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य सेवेअभावी अल शिफा रुग्णालयात तीन चिमुरड्यांचा मृत्यू झाला.