रुग्णांनी दुकानातून कोणते औषध घ्यावे, हे डॉक्टर लिहून देतात आणि ते केवळ औषध विक्रेत्यालाच वाचता येते, असे विनोदाने म्हटले जाते, आणि त्यात काही अंशी तथ्यही आहे. पण औषध विक्रेत्यालाही ते नीट वाचता आले नाही किंवा चुकीचे वाचून त्याने भलतेच औषध दिले, असे होऊ नये तसेच रुग्णालाही औषधाचे डॉक्टरने लिहिलेले नाव वाचता यावे, यासाठी डॉक्टरांनी गिचमिडय़ा अक्षरात, घाईघाईत औषधपत्र अर्थात प्रिस्क्रिप्शन लिहून देऊ नये तर ते कॅपिटल अक्षरातच असावे, असा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. या बदलासाठी डॉक्टरांचा मात्र पूर्ण विरोध आहे.
भारतीय वैद्यकीय परिषदेनेही या मसुदा अधिसूचनेस मंजुरी दिली असून, त्यानुसार डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शन पहिल्या लिपीत म्हणजे कॅपिटल लेटर्समध्ये लिहून द्यावे लागेल. औषधांच्या प्रिस्क्रिप्शनबाबत काही तक्रारी आहेत. काही डॉक्टरांचे हस्ताक्षर वाचता येण्यासारखे नसते. औषध विक्रेते चुकीची औषधे देतात, कारण सारखेच उच्चार असलेली औषधांची काही नावे आहेत, त्यामुळे हा गोंधळ टाळण्यासाठी तसेच बनावट प्रिस्क्रिप्शनला आळा बसावा यासाठीही त्याचा उपयोग होईल असे सांगण्यात येत आहे. याबाबतची अधिसूचना आरोग्य मंत्रालयाच्या मंजुरीनंतर काढण्यात येणार असून, या संकल्पनेची अंमलबजावणी करण्याचा विचार आहे. हा निर्णय झाल्यानंतर देशभरातील डॉक्टरांना नवीन नियम पाळण्यास सांगितले जाईल. डॉक्टरांनी लिहिलेली प्रिस्क्रिप्शन वा औषधपत्रे अनेकदा वाचता येत नाहीत, त्यावरून अनेकदा वादविवादही झाले आहेत, त्यामुळे वाचता येतील अशी प्रिस्क्रिप्शन असावीत यासाठी काही नियम असावेत अशी संकल्पना होती.
काही औषधे जवळपास सारख्या स्पेलिंगची किंवा उच्चाराची असतात. उदाहरणार्थ, सेलिन (क जीवनसत्त्व) सेलीब ( सेलेकोक्सिब, संधिवातावरील औषध), मॅलन क्विन ( क्लोरोक्विन- मलेरियावरचे औषध), महाक्विन ( लोमेफ्लोक्सॅसिन, प्रतिजैविक) व अझू (अॅझिथ्रोमायसिन- प्रतिजैविक) व अॅझॉक्स (अल्प्राझोलम- नैराश्यरोधक).
अधिकृत सूत्रांनी सांगितले, की जवळपास सारख्याच नावाच्या पण वेगळय़ा रोगांवर असलेल्या औषधांची नावे जर डॉक्टरांचे हस्ताक्षर चांगले नसेल तर गोंधळून टाकतात त्यामुळे हा प्रस्ताव अनेक दिवस चर्चेत होता. सार्वजनिक क्षेत्रातील डॉक्टरांना असे वाटते, की त्यांच्यावर अगोदरच कामाचा बोजा जास्त असतो, त्यामुळे कॅपिटल लेटर्स (पहिल्या लिपीत) प्रिस्क्रिप्शन लिहिणे हा वेळेचा अपव्यय होईल. हा प्रश्न केवळ भारतापुरता मर्यादित नाही. अनेक वैद्यकीय नियतकालिकांत विविध देशांतील प्रिस्क्रिप्शन डॉक्टर कशी लिहितात यावर पाहणी अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. भारतात त्या देशांपेक्षा एकच अडचण जास्त आहे ती म्हणजे औषधे सारख्याच उच्चाराची व सारखीच अक्षरे असलेली असल्याने केमिस्टचा गोंधळ होतो. काही वेळा चुकीची औषधे दिली गेल्याने रुग्णांना या औषधांचा खूप त्रास होऊ शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा