कुख्यात ओसामा बिन लादेन याला पकडण्यात अमेरिकन गुप्तचर संस्थेला महत्त्वाची मदत करणारे डॉ. शकील आफ्रिदी यांना गेल्या वर्षी ठोठावण्यात आलेली ३३ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा रद्द करीत त्यांच्यावर नव्याने खटला भरण्याचा आदेश प्रांतिक गुन्हे नियामक आयोगाने गुरुवारी दिला.
लष्कर-ए-इस्लाम या दहशतवादी गटाला तसेच अमेरिकेच्या गुप्तचर खात्याला मदत केल्याचा ठपका ठेवत २४ मे २०१२ रोजी आदिवासीबहुल प्रांतातील राजकीय दूताने ३३ वर्षीय डॉ. आफ्रिदी यांना ३३ वर्षांची ही सजा ठोठावली होती. न्यायाधीशाचे अधिकार असलेल्या राजकीय दूताने ही सजा ठोठावताना आपली कक्षा ओलांडल्याचे नमूद करीत प्रांतिक गुन्हे नियामक आयोगाचे अध्यक्ष साहबजादा महम्मद अनीस यांनी नव्याने खटला भरण्याचा आदेश देत डॉ. आफ्रिदी यांना दिलासा दिला. डॉ. आफ्रिदी हे सध्या पेशावरमधील तुरुंगात आहेत. मानवी हक्क संघटनांनी त्यांच्या सुटकेची मागणी सातत्याने रेटली आहे. अमेरिकेनेही त्यांची सुटका होत नाही तोवर प्रत्येक वर्षांमागे पाकिस्तानला मिळणाऱ्या मदतीत १० लाख डॉलरची कपात लागू करून पाकिस्तानवर दडपण कायम राखले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा