Doctors deliver baby on bangkok street After Earthquake watch Video : थायलंड येथे झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान बँकॉकमध्ये पोलीस जनरल हॉस्पिटलच्या बाहेर रस्त्यावर डॉक्टरांनी एका बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी जेव्हा भूकंपाचे हादरे बसले तेव्हा महिलेवर शस्त्रक्रिया केली जात होती. पण भूकंपामुळे डॉक्टरांना रुग्णालय सोडून बाहेर पडावे लागले. वैद्यकीय पथकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील रुग्णांना तात्काळ इमारतीच्या बाहेर काढले. यानंतर वैद्यकीय कर्मचार्‍यांनी सर्व बाजूने रिंगण केले आणि महिलेने रस्त्यावर मुलाला जन्म दिला, असे रुग्णालयाचे प्रवक्ते पोलीस कर्नल सिरिकुल श्रीसांगा यांनी सांगितले.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यामधअये एक महिला स्ट्रेचरवर झोपलेली दिसत आहे आणि रुग्णालयातील कर्मचारी खुल्या जागेत तिला मदत करताना दिसत आहेत. रुग्णालयातील इतर रुग्ण असलेले स्ट्रेचर्स देखील रुग्णालयाच्या बाहेर काढण्यात आल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

थाय इन्क्वायरर (Thai Enquirer)ने दिलेल्या माहितीनुसार, भूकंप आला तेव्हा महिलेवर शस्त्रक्रिया केली जात होती. दरम्यान ही महिला रुग्ण आणि तिचे मुल यांची प्रकृती सध्या स्थिर असून ते सध्या रुग्णालयाच्या खोलीत उपचार घेत आहेत अशी माहिती सर्जन डॉक्टरांनी दिली आहे.

शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी १२.५० च्या सुमारास म्यानंमारला दोन शक्तिशाली भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपाची तीव्रता ७.७ आणि ६.४ इतकी होती. थायलंडमधील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे इमारती कोसाळल्याचे पाहायला मिळाले.

या शक्तिशाली भूकंपामुळे म्यानमारमधील मृतांची संख्या शनिवारी एक हजारच्या वर गेली आहे. थायलंडमधील बँकॉक शहरातील अधिकाऱ्यांनी सांगितले की आतापर्यंत सहा मृतदेह आढळले आहेत आणि २६ जण जखमी आहेत. तसेच ४७ जण अद्यापही बेपत्ता आहेत.