वेगवेगळ्या नेत्यांवरील टीकांमुळे नेहमी चर्चेत येणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी आपला मोर्चा आता महालेखापरीक्षक (कॅग) विनोद राय यांच्याकडे वळविला आहे. राय यांना पंतप्रधान बनायचे आहे का, असा खोचक प्रश्न दिग्विजयसिंह यांनी शुक्रवारी विचारला.
केवळ संसदेला लेखापरीक्षणाचे अहवाल सादर करणे, एवढेच महालेखापरीक्षकांचे काम नाही, असे राय यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानाला दिग्विजयसिंह यांनी प्रत्त्युत्तर दिले.
कॅगचे काम काय, हे घटनेमध्ये लिहून ठेवले आहे आणि प्रत्येकाने आपले काम त्यापद्धतीने केले पाहिजे. जर उद्या न्याय मंडळाने कार्यकारी मंडळाचे काम केले, कॅगने धोरण ठरविण्यास सुरुवात केली आणि नागरिकांनी कायदे तयार केले, तर लोकशाही कशी चालेल? कॅगला लेखा परीक्षणाचे काम करायचे नाही, तर पंतप्रधान बनायचे आहे का, असा प्रश्न दिग्विजयसिंह यांनी उपस्थित केला.
टू जी घोटाळा आणि कोळसा खाणीचे वाटप या दोन प्रकरणात कॅगने सादर केलेल्या अहवालामुळे केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मॅसॅच्युसेट्समधील हार्वर्ड केनेडी शाळेत झालेल्या व्याख्यानात बोलताना राय यांनी पुढील प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, सार्वजनिक क्षेत्रात लेखापरीक्षणाचे काम करताना आम्ही केवळ संसदेमध्ये अहवाल सादर करावे की लेखापरीक्षकांच्या अहवालांच्या माध्यमातून जनमत आजमावून पाहावे? विशेषतः आरोग्य, प्राथमिक शिक्षण, पाणी प्रदूषण, पर्यावरण यासारख्या सामाजिक क्षेत्रांमध्ये लेखापरीक्षणाच्या अहवालांच्या माध्यमातून जनमत तयार करायला नको का?
भारतीय लोकशाही परिपक्व होते आहे आणि शहरातील मध्यमवर्गियांचा सामाजिक जीवनातील सहभागही वाढतो आहे, याकडेही राय यांनी लक्ष वेधले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा