नवी दिल्ली : कोलकाता शहरानजीकच्या मुर्दाड वस्त्यांतील जगण्याच्या विविधांगी विरोधाभासाची कहाणी ‘सिटी ऑफ जॉय’मधून मांडणारे लेखक, भटके पत्रकार आणि सामाजिक दातृत्वाचा मोठा ठसा उमटविणारे फ्रेंच साहित्यिक डॉमिनिक लापिएर यांचे वृद्धापकालाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांनी दिलेल्या सामाजिक योगदानाबद्दल भारत सरकारतर्फे २००८ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
‘फ्रिडम अॅट मिडनाईट’, ‘इज पॅरिस बर्निग’, ‘फाइव्ह पास्ट मिडनाईट इन भोपाल’ ही सहलेखक म्हणून लिहिलेली त्यांची पुस्तके प्रचंड गाजली. मात्र त्यांची जगभर ओळख झाली ती कोलकाता शहराला केंद्र करून येथील गरिबी, हलाखीच्या जगण्यात आनंद शोधणाऱ्या व्यक्तींवरच्या ‘सिटी ऑफ जॉय’ कादंबरीमुळे. या कादंबरीवर आधारलेल्या याच नावाच्या चित्रपटाचेही कौतुक झाले.
फ्रान्समध्ये जन्मलेले लापिएर तेराव्या वर्षी वडिलांसह अमेरिकेत गेले. अठराव्या वर्षी त्यांना अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. भटकण्याचा आणि लिहिण्याचा छंद त्यांना अमेरिकी वास्तव्यात लागला. पुढे फ्रान्समध्ये परतल्यानंतर त्यांनी काही काळ लष्करी सेवा केली. लॅरी कॉलिन्स या अमेरिकी पत्रकार- लेखकासह त्यानी अनेक संशोधन प्रकल्प पूर्ण केले.
पुस्तकानंतर..
१९८५ साली आलेल्या ‘सिटी ऑफ जॉय’ कादंबरीमध्ये रिक्षावाल्या व्यक्तीची कहाणी लापिएर यांनी रंगविली आहे. रोलंड जोफ यांनी दिग्दर्शित केलेल्या या कादंबरीवरील चित्रपटात ओम पुरी, शबाना आझमी आणि पॅट्रिक स्वेझी यांनी प्रमुख व्यक्तिरेखा साकारल्या होत्या.
भोपाळ दुर्घटनेनंतर..
‘फाइव्ह पास्ट मिडनाईट इन भोपाल’ या पुस्तकासाठी मिळालेले सारे मानधन त्यांनी भोपाळ दुर्घटनेतील पीडितांसाठी राखून ठेवले. ‘संभावना’ नावाने त्यांनी पीडितांवर मोफत उपचार करणारी आरोग्य यंत्रणा उभारली. तसेच या भागात त्यांनी प्राथमिक शाळाही सुरू केली.
कोलकात्याशी नाते..
‘सिटी ऑफ जॉय’ या कादंबरीच्या लोकप्रियतेनंतर मिळालेले मानधन आणि पुस्तकाच्या विक्री रकमेतील निम्मा निधी त्यांनी कोलकात्यामधील विविध वस्त्यांमध्ये सामाजिक कार्यासाठी वापरला. ‘सिटी ऑफ जॉय फाऊंडेशन’ या त्यांच्या संस्थेतर्फे कुष्ठरोगी, पोलिओग्रस्त रुग्णांसाठी निवारा केंद्रे उभारण्यात आली. शाळा, आरोग्य सुविधा, पुनर्वसन केंद्रेही उभारण्यात आली. फ्रान्समध्येही या फाऊंडेशनसाठी निधी उभारण्याकामी त्यांनी पुढाकार घेतला.