Donald Trump on Canada: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाचा कारभार स्वीकारल्यापासून ते चर्चेत आहेत. अध्यक्षपदावर आल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांवर वाद निर्माण झाला आहे. त्यातला एक निर्णय म्हणजे इतर देशांवर टेरिफ दर लागू करणे. त्याव्यतिरिक्त त्यांनी कॅनडाबाबत केलेलं विधानही विशेष चर्चेत आलं आहे. कॅनडाचा समावेश अमेरिकन संघराज्यात ५१वं राज्य म्हणून केला जाईल, असं ते म्हणाले होते. आता त्यांनीच निवडलेले कॅनडाचे भावी राजदूत पेट होएक्सत्रा यांनी ट्रम्प यांच्या भूमिकेशी जाहीरपणे फारकत घेतली आहे.
काय म्हणाले होते डोनाल्ड ट्रम्प?
अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेचं ५१वं राज्य म्हणून जोडण्याचा मानस बोलून दाखवला होता. त्यांच्या या भूमिकेवर आंतरराष्ट्रीय समुदायात पडसाद उमटले होते. खुद्द कॅनडाकडून या भूमिकेचा निषेध करण्यात आला होता. याव्यतिरिक्त डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर मोठ्या प्रमाणावर टेरिफ लागू केलं आहे. त्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असली, तरी कॅनडाच्या बाबतीत अमेरिकेचं धोरण हे पुढील काळात अधिक कठोर असेल, हे यावरून स्पष्ट झाल्याचं दिसत आहे.
पेट होएक्सत्रा यांची वेगळी भूमिका
पेट होएक्सत्रा यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडातील अमेरिकेचे राजदूत म्हणून निवडलं आहे. मात्र, अधिकृतरीत्या पदाचा कार्यभार स्वीकारण्याआधीच पेट यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेच्या विरुद्ध भूमिका घेतली आहे.
अमेरिकेतन सिनेट हाऊसमध्ये सिनेटर ख्रिस कून्स यांनी कॅनडाबाबत पेट यांना विचारणा केली असता त्याबाबत स्पष्ट विधान केलं. “कॅनडा हे एक सार्वभौम राज्य आहे”, असं पेट म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाबाबत घेतलेल्या भूमिकेच्या विरुद्ध भूमिका जाहीर केल्यानंतरही पेट यांनी ट्रम्प यांचं कौतुकदेखील केलं.
“अमेरिका व कॅनडा या दोन देशांना एकत्र काम करण्याचा मोठा इतिहास आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं मुक्त व न्याय्य व्यापारविषयक धोरण हे दोन्ही देशांमधील व्यापारविषयक संबंध अधिक वृद्धिंगत करतील. कॅनडासोबतचे संबंध यामुळे सुधारण्यास मदत होईल”, असं पेट यांनी नमूद केलं.
कोण आहेत पेट होएक्सत्रा?
पेट हे मिशिगनमधून सिनेट सदस्य म्हणून निवडून आले होते. ट्रम्प यांच्या आधीच्या कार्यकाळात पेट यांनी नेदरलँड्समध्ये अमेरिकेचे राजदूत म्हणून काम पाहिलं आहे. एक शेजारी देश म्हणून पेट यांनी कॅनडाचं कौतुकदेखील केलं आहे. अमेरिकेतली ३६ राज्यांसाठी कॅनडा हे व्यापारासाठी सर्वाधिक प्राधान्याचं ठिकाण असल्याचीही भूमिका त्यांनी मांडली आहे.