अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या प्राथमिक निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प फ्लोरिडामध्ये आघाडीवर आहेत. तर ओहिओमध्ये ते पिछाडीवर पडले आहेत. ट्रम्प यांनी १४ राज्यांमध्ये विजय मिळविताना आघाडी घेतली आहे. फ्लोरिडामध्ये ४५८ मतांसह ते आघाडीवर आहेत. टेड क्रुझ (३५९) दुसऱ्या तर माकरे रुबिओ (१५१) तिसऱ्या क्रमांवर आहेत. ट्रम्प यांना रोखण्यासाठी विरोधकांकडे ही शेवटची संधी आहे. फ्लोरिडामध्ये ट्रम्प विजयी ठरल्यास त्यांना रोखणे कठीण ठरणार आहे.
फ्लोरिडामध्ये ट्रम्प ४३ टक्के मतांसह आघाडीवर असून रिपब्लिकन मते खेडण्यात ते यशस्वी ठरल्याचे ‘फॉक्स न्यूज’ने म्हटले आहे. रुबिओ यांची निवडणुकीतील कामगिरी अतिशय निराशाजनक ठरली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीतील स्थान टिकविण्यासाठी त्यांना त्यांच्या राज्यात अधिक मते मिळवावी लागणार आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर असतानाही रुबिओ यांनी प्राथमिक निवडणुकीत विजय मिळविण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. इतर अनेक राज्यांसह फ्लोरिडामध्येही पिछाडीवर असलो तरी अध्यक्षपदीय निवडणुकीच्या शर्यतीतील स्थान टिकविण्यासाठी फ्लोरिडा महत्त्वाचे असल्याचे रुबिओ म्हणाले.
फ्लोरिडामध्ये मला हरविण्याची क्षमता केवळ ट्रम्प यांच्यात आहे. ट्रम्प हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसावे असे नागरिकांना वाटत असेल तर ते मला मतदान करतील, असेही रुबिओ म्हणाले. रुबिओ यांना अध्यक्षपदीय निवडणुकीसाठी कमी संधी असल्याचे मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.