Donald Trump : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प विराजमान झाले आहेत. अमेरिकेच्या संसदेत त्यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. आपल्या देशात आत्तापासून सुवर्ण युग सुरु झालं आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचाही त्यांनी उल्लेख आपल्या पहिल्याच भाषणात केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट चा नारा दिला. तसंच ते म्हणाले, “आपण एक महान देश होतो आणि आहोत आपल्याला आणखी महोत्तम व्हायचं आहे. आपल्या समोर असलेली सगळी आव्हानं आपल्या एक एक करुन संपवायची आहेत. उत्तर कॅरोलिनामध्ये जे झालं ते वाईट होतं. माझ्या आधीच्या सरकारने सीमा संरक्षणासाठी म्हणावा तितका खर्च केला नाही. अमेरिकेची अखंडता कायम ठेवणं हे आपलं मुख्य उद्दीष्ट असणार आहे.”

अमेरिकेत सुवर्ण युग सुरु झालं आहे-ट्रम्प

मी पुन्हा एकदा देशाचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो आहे. आत्तापासून अमेरिकेत सुवर्ण युग सुरु झालं आहे. देशात बदलाची लाट आली आहे. ही एका नव्या रोमांचक युगाची सुरुवात आहे यात माझ्या मनात काहीही शंका नाही असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ

जीवघेण्या हल्ल्यातून मला देवाने वाचवलं कारण…

अमेरिका माझ्यासाठी सर्वोच्च स्थानी आहे. एक अभिमानास्पद, स्वतंत्र आणि समृद्ध अमेरिका घडवणं हे आता माझ्यापुढचं उद्दीष्ट आहे. माझ्यावर निवडणूक प्रचाराच्या दरम्यान जीवघेणा हल्ला झाला होता. मात्र या हल्ल्यातून मला देवाने वाचवलं कारण अमेरिका पुन्हा एकदा महान बनवायची होती म्हणूनच हे घडलं.

२० जानेवारी हा दिवस म्हणजे अमेरिकेसाठी स्वातंत्र्य दिवस आहे असंच मला वाटतं-ट्रम्प

आजची तारीख म्हणजेच २० जानेवारी हा अमेरिकेसाठी स्वातंत्र्याचा दिवस आहे असंच मला वाटतं आहे. आपल्या देशाशी शत्रुत्व घेतलं तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ आणि धडा शिकवू या आशयाचं वक्तव्यही ट्रम्प यांनी केलं. माझ्यावर प्रचारादरम्यान हल्ला झाला होता. मात्र मी वाचलो कारण मला अमेरिकेला खूप पुढे न्यायचं आहे असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

१४ जुलै २०२४ रोजी ट्रम्प यांच्यावर हल्ला

१४ जुलै २०२४ या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्यात आला. पेनेसिल्व्हेनियातील बटलर या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प प्रचारसभेला संबोधित करत होते. त्याचवेळी त्यांच्यावर गोळीबार झाला. ही गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली. सिक्रेट सर्व्हिस एजंट्सनी डोनाल्ड ट्रम्प यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवलं ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले. याच हल्ल्याचा उल्लेख डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump 2025 oath ceremony he said this thing about his attack which happened in july 2024 scj