मानवी हक्क प्रमुखांची ट्रम्प यांच्यावर अप्रत्यक्ष टीका
कट्टर धर्माधता व लोकांमध्ये भय निर्माण करण्याची वृत्ती ही पुढे हिंसेच्या मार्गाने जाणारी असते असा टोमणा संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क प्रमुखांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता मारला आहे. अमेरिकी अध्यक्षीय उमेदवारांच्या निवडणुकीत कट्टर धर्माधतेला खतपाणी घालणारा प्रचार केला जात आहे हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उमेदवारीसाठी निवडणूक लढवत आहेत.
ओहियोतील क्लिव्हलँड विद्यापीठात बोलताना मानवी हक्क प्रमुख झैद राद अल हुसेन यांनी सांगितले की, धर्माधता हा खंबीर नेतृत्वाचा पुरावा किंवा लक्षण नसते. द्वेषमूलक व प्रक्षोभक भाषणे तसेच इतरांना वंचित ठेवण्यातून राजकीय लाभ मिळवणे हे समाजमान्य नाही. त्यातून अमेरिकेसारख्या महान देशाला काही जण अडचणीत आणीत आहेत. भेदभाव हा शक्तिशाली असतो पण तो पुढे जाऊन विध्वंसक ठरतो याची जाण त्यांनी ठेवावी.
गेल्या काही महिन्यांत ट्रम्प यांनी अमेरिका-मेक्सिको सीमेवर भिंत बांधून स्थलांतरिताना रोखणार असल्याचे तर सांगितलेच शिवाय मुस्लिमांच्या अमेरिकेत येण्यावर बंदीचे सूतोवाच केले. हुसेन यांनी त्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. झैद यांनी ट्रम्प यांचे नाव न घेता सांगितले की, अध्यक्षीय शर्यतीतील एका उमेदवाराने छळवणुकीच्या मार्गाची पाठराखण केली आहे व मुस्लिमांनाही लक्ष्य केले आहे. संबंधितांची वक्तव्ये द्वेषमूलक, अल्पसंख्याकात भीती निर्माण करणारी आहेत. मुस्लिमांवर अमेरिकेत येण्यास बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडणारे ट्रम्प हे बेजबाबदार आहेत असे झैद यांनी डिसेंबरमध्ये सांगितले होते. अमेरिकेने गेल्या अनेक वर्षांत सभ्यता, सामाजिक एकोपा या तत्त्वांची जोपासना केली त्यालाच सुरूंग लावला जात आहे.