US bans government staff in China from romantic relationships with Chinese citizens : अमेरिकेच्या सरकारने चीनमध्ये असलेले सरकारी कर्मचारी आणि चिनी नागरिक यांच्यातील प्रेमसंबंध किंवा शरीरसंबंधांवर बंदी घातली आहे. असोशिएटेड प्रेसने गुरूवारी यासंबंधीचे वृत्त दिले आहे. अमेरिकन सरकारचे हे निर्देश राजदूत, त्यांचे कुटुंबिय आणि सेक्युरिटी क्लिएरन्स असलेले कंत्राटदार यांना लागू असणार आहेत. तसेच हे निर्देश जानेवारीमध्ये अमेरिकेचे राजदूत निकोलस बर्न्स यांनी चीनमधून बाहेर पडण्यापूर्वी लागू केले होते, अशी माहिती देखील समोर आली आहे.
ही बंदी मेनलँड चाइना येथील यूएस मिशन यासह बीजिंग येथील दूतावास आणि ग्वांगझू, शांघाई, शेनयांग, वुहान आणि हाँगकाँग येथील वाणिज्य दूतावास (consulates) यांना देखील लागू असणार आहे. ज्यानुसार अमेरिकन नागरिक आण चिनी नागरिक यांच्यात कोणतेही प्रेमसंबंध किंवा शारीरिक संबंधांवर बंधने घालण्यात आली आहेत. संवेदनशील माहिती हाताळणारे कंत्राटदार आणि कुटुंबियांसाठी देखील ही बंधने असणार आहेत.
हे निर्बंध चीनच्या बाहेरील अमेरिकन नागरिकांसाठी नसणार आहेत. तसेच जे आधीपासूनच एखाद्या चिनी व्यक्तीबरोबर नात्यात असतील ते या निर्बंधातून सूट मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. पण त्यांचा हा मागणी अर्ज जर फेटाळण्यात आला तर त्यांना त्यांचे नाते संपवावे लागेल किंवा त्यांचे पद सोडावे लागेल.
या धोरणाबद्दल जाहीरपणे घोषणा करण्यात आलेली नाही पण याबद्दल अमेरिकेच्या अधिकार्यांना विभागाअंतर्गत जानेवारी महिन्यात याबद्दल माहिती पोहोचवण्यात आली आहे. यातून चीन आणि अमेरिका यांच्यातील अत्यंत ताणलेले संबंध पुन्हा एकदा समोर आले आहेत.
शीत युद्धाच्या दिवसांची आठवण ताजी
अशी नाते ठेवण्यावर घालण्यात आलेली बंदी हा मोठा निर्णय मानला जात आहे. यामुळे शीत युद्धाच्या काळातील आठवणी ताज्या झाल्या आहेत. तेव्हा देखील चीन आणि सोव्हिएत युनियनच्या ताब्यात असलेल्या भागातील अमेरिकन नागरिकांवर अशाच प्रकारची बंधने घालण्यात आली होती. तेव्हा अमेरिकन सरकार हेरगिरीचा धोका टाळण्यासाठी तसेच वैयक्तिक संबंधांमधून देशासाठी संवेदनशील असलेली माहिती शत्रूंना दिली जाऊ नये यासाठी त्यांच्या राजनैतिक अधिकार्यांवर कठोर नियम घालण्यात आले होते.
१९९१ मध्ये सोव्हिएत यूनियन कोसळल्यानंतर हे नियम शिथिल करण्यात आले. पण या निर्णयामुळे चिनी सरकारकडून पुन्हा एकदा वैयक्तिक संबंधांमधून माहिती मिळवण्याचे प्रयत्न होत असल्याची शक्यता आहे.