25 Percent Teriff on Imported Cars in US: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदा स्थलांतरीत व एचवन व्हिसासंदर्भात घेतलेले निर्णय चर्चेत आल्यानंतर आता त्यांनी आणखी एक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा जागतिक स्तरावर कार उत्पादक कंपन्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अमरिकेतील अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. काही भारतीय कंपन्यांच्या कार्स अमेरिकेत आयात केल्या जातात. या कंपन्यांवरही या निर्णयाचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

नेमका काय आहे निर्णय?

डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी हा निर्णय जाहीर केला. यानुसार, आता अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या विदेशी कार व कारसाठीचं साहित्य या गोष्टींवर तब्बल २५ टक्के कर लागू होणार आहे. हे नवे कर येत्या ३ एप्रिलपासून लागू होणार आहेत. काही कंपन्यांच्या तयार कार्स अमेरिकेत आयात केल्या जातात, तर काही विदेशी कंपन्यांच्या कारचे वेगवेगळे पार्ट अमेरिकेत आयात होतात व तेथील प्लांटमध्ये ते जोडले जातात. अमेरिकेतील या दोन्ही प्रकारच्या व्यवसायांवर यामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेतील ऑटो व्यवसायाला चालना देऊन उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असला, तरी यामुळे अमेरिकन ऑटो व्यवसायातील उत्पादनांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जागतिक ऑटो उद्योगावर परिणाम होणार?

हल्ली अनेक कार उत्पादक कंपन्यांचे वेगवेगळ्या देशांमध्ये प्लांट असून तिथेच या कार असेम्बल्ड केल्या जातात. अमेरिकेचा विचार केला तर देशात विकल्या जाणाऱ्या एकूण वाहनांपैकी किमान निम्मी वाहने आयात केलेली असल्याचा अंदाज आहे. त्याशिवाय, अमेरिकेत तयार केल्या जाणाऱ्या कार्ससाठी वापरल्या जाणाऱ्या भागांपैकी ६० टक्के भाग हे इतर देशांमधून आयात केलेले असतात. त्यामुळे ट्रम्प याच्या या निर्णयाचा मोठा फटका अमेरिकेतल्या ऑटो उद्योगाला व पर्यायाने अमेरिकेतील कार खरेदीदार ग्राहकांना बसणार आहे.

General Motors, Ford ला बसणार फटका

अमरिकन सरकारने लागू केलेल्या या नव्या टेरिफचा फटका प्रामुख्याने अमेरिकेतील मोठ्या कार उत्पादक कंपन्यांना बसणार आहे. यामध्ये अमेरिकेतल्या जनरल मोटर्स, फोर्ड मोटर कंपनी यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या दोन्ही कंपन्यांचे प्लांट्स शेजारच्या कॅनडा व मेक्सिकोमध्ये आहेत. यामुळे नव्या कार्सच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात.

भारतावर काय परिणाम होणार?

अमेरिकन शेअर बाजारात ऑटो उद्योगाचा हिस्सा दखलपात्र असून या क्षेत्रात होणाऱ्या घडामोडींचा परिणाम अमेरिकन शेअर बाजारावर व पर्यायाने भारतीय शेअर बाजारावरही होण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर अमेरिकेतील मोठ्या ऑटो कंपन्यांचे शेअर्स कोसळले आहेत. यात जनरल मोटर्सचे शेअर्स ७ टक्क्यांनी तर फोर्ड व स्टॅलेन्टिसचे शेअर्स प्रत्येकी ४ टक्क्यांनी कोसळले आहेत. टेस्ला सर्वात कमी भाग बाहेरून आयात करणारी कंपनी असून टेस्लाचे शेअर्स फक्त १ टक्क्यांनी घसरल्याचं दिसत आहे.

भारतातील टाटा, महिंद्रा अशा कंपन्यांकडून कारचे अनेक भाग अमेरिकेत निर्यात केले जातात. अशा स्थितीत या कंपन्यांना या भागांसाठी कमी दर आकारणाऱ्या इतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे. याशिवाय, युरोप व आशियातील अमेरिकेच्या व्यापरविषयक मित्रराष्ट्रांमध्येही या निर्णयामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषत: जर्मनी, जपान व दक्षिण कोरियातून मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत कार व कारसाठीचे भाग निर्यात होतात. Mercedes-Benz चे सीईओ ओला कलेनियस यांनी यासंदर्भात चिंता व्यक्त केली असून तरीही सध्या अमेरिकेतील गुंतवणूक कायम ठेवणार असल्याची भूमिका घेतली आहे.