पीटीआय, न्यूयॉर्क/वॉशिंग्टन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली धमकी खरी करत जगातील ६० देशांवर ‘जशास तसे’ आयातशुल्क लागू करण्याची घोषणा केली. अमेरिकी प्रमाणवेळेनुसार बुधवारी संध्याकाळी त्यांनी आदेशावर स्वाक्षरी केली. या आदेशानुसार भारतीय मालावर २७ टक्के आयातशुल्क लादण्यात येणार असून मुख्य अर्थव्यवस्थांमध्ये चीननंतर ‘मित्र’ भारताचाच क्रमांक लागला आहे.

महसुली तूट कमी करून देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी ही करवाढ केल्याचा दावा ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत केला. आदेशावर ट्रम्प यांनी केलेल्या एका स्वाक्षरीमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था अमुलाग्र बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आता करवाढ लादलेल्या ६० देशांसह जगभरातील अर्थतज्ज्ञ बदलत्या स्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. अमेरिकी वस्तूंवर भारत मोठ्या प्रमाणात आयातशुल्क लावत असल्याचा आरोप ट्रम्प प्रशासनाने वारंवार केला. बुधवारच्या आयातशुल्क वाढीत त्याचे प्रतिबिंब दिसले. भारतावर लादलेल्या कराबाबत ट्रम्प म्हणाले, ‘‘भारताबरोबर व्यवहार अतिशय कठीण आहेत. पंतप्रधान (मोदी) नुकतेच येऊन गेले. ते माझे खूप चांगले मित्र आहेत. मी त्यांना म्हणालो, तुम्ही माझे मित्र आहात. पण, तुम्ही आमच्याशी योग्य व्यवहार करीत नाहीत.’’

हा मुक्तिदिन आहे. दीर्घ काळापासून याची प्रतीक्षा होती. २ एप्रलि २०२५ हा भविष्यात अमेरिकी उद्याोगांचा पुनर्जन्मदिन म्हणून ओळखला जाईल. अमेरिकेने गतकाळातील वैभव पुन्हा मिळविल्याचा हा दिवस असेल आणि अमेरिकेला पुन्हा श्रीमंत बनविण्यास सुरुवात केल्याचा हा दिन असेल. आपण आता आणखी श्रीमंत होणार आहोत. डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका

ट्रम्प यांच्यासाठी अमेरिका प्रथम असेल, पण मोदी यांच्यासाठी भारत प्रथम आहे. अमेरिकेने लादलेल्या जशास तशा कराच्या संभाव्य परिणामांचा आम्ही अभ्यास करीत आहोत. पंकज चौधरी, केंद्रीय अर्थराज्यमंत्री