Donald Trump Assassination Attempt : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला त्यातून ते बालंबाल बचावले. नोव्हेंबर २०२४ मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ते पेनसिल्व्हेनियातील बटलर या ठिकाणी प्रचारासाठी आले होते. यावेळी समोरच्या इमारतीवर लपून बसलेल्या हल्लेखोराने ट्रम्प यांच्यावर गोळी झाडली. रिपब्लिकन पक्षाने अद्याप ट्रम्प यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलेले नाही. गोळीबाराच्या घटनेनंतर पक्ष काय निर्णय घेतो, हे आता लवकरच समोर येईल. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणादरम्यान अवैध स्थलातंराचा मुद्दा तावातावाने मांडला. यासाठी त्यांनी मागे लावलेल्या फलकाकडे वळून बघितले आणि तेवढ्यात गोळी सुटली. ही गोळी डोक्याच्या अवघ्या दोन सेंटिमीटर अंतरापासून गेल्यामुळे ट्रम्प बचावले गेले.

राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचा विजय होतो की पराजय? याचा निकाल नोव्हेंबरमध्ये लागेलच. मात्र त्याआधीच त्यांनी मृत्यूला हरवले असल्याचे बोलले जात आहे.

हे वाचा >> डोनाल्ड ट्रम्प यांचे प्राण वाचण्याचा आणि भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेचा नेमका संबंध काय?

अवैध स्थलांतराच्या फलकाने मला वाचवले

बटलर येथील सभेत बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतराचा मुद्दा उपस्थित केला. त्यासाठी त्यांनी त्यांच्यामागे असलेल्या फलकाकडे बोट दाखविण्यासाठी मान वळवली आणि तेवढ्यात गोळी कानाला चाटून गेली. गोळी कानाला लागताच डोनाल्ड ट्रम्प खाली बसले आणि त्यांच्या कानातून रक्तस्त्राव सुरू झाला. सिक्रेट सर्विसेसच्या जवानांनी त्यांच्याभोवती कडे करत त्यांना सुरक्षितपणे मंचावरून खाली नेले. हल्ल्याच्या काही तासानंतर व्हाईट हाऊसचे माजी डॉक्टर रॉनी जॅक्सन यांच्याशी फोनवर बोलताना ट्रम्प म्हणाले की, त्या फलकामुळे माझे प्राण वाचले.

डॉ. जॅक्सन यांनी न्यूयॉर्क टाइम्सला मुलाखत दिली असताना ट्रम्प आणि त्यांच्यात काय संवाद झाला, याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, अवैध स्थलांतराच्या त्या फलकामुळे माझे प्राण वाचले. मी जर त्या फलकाकडे पाहण्यासाठी वळलो नसतो तर गोळी माझ्या डोक्यात शिरली असती.

हे ही वाचा >> ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला… आतापर्यंत चार अमेरिकी अध्यक्षांच्या हत्या; तिघांच्या हत्येचा प्रयत्न!

त्या फलकावर काय लिहिले होते?

डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष असल्यापासून अमेरिकेत अवैधपणे होणाऱ्या स्थलांतराचा मुद्दा उचलत आले आहेत. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याची भाषा वापरली होती. न्यूयॉर्क टाइम्सने या फलकाचा एक फोटो आता सादर केला आहे. ज्यामध्ये “अमेरिकेत होणारे अवैध स्थलांतर”, असे स्पष्टपणे दिसत आहे. या फलकावर वर्ष २०१२ ते २०२४ या दरम्यान किती स्थलांतर अवैधपणे झाले. याची माहिती दिली गेली आहे.

Attack on US Former President Donald Trump
अमेरिकेते माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, कानाला चाटून गेली गोळी, थोडक्यात बचावले. (फोटो सौजन्य-ANI)

हे ही वाचा >> ट्रम्प यांच्यावर हल्ला करणारा शूटर थॉमस मॅथ्यू क्रुक्स कोण होता? त्याने हा हल्ला कसा केला? या हल्ल्यामागचे कारण काय?

सिक्रेट सर्व्हिसने काय म्हटले?

सिक्रेट सर्व्हिसने या घटनेनंतर निवदेन प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, ‘ट्रम्प यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर एका उंच ठिकाणी इमारतीवर होता. त्या ठिकाणाहून त्याने ट्रम्प यांच्यावर काही राऊंड फायर केले. त्यानंतर हल्लेखोराला ठार करण्यात आले आहे. या हल्ल्यात एका समर्थकाचा मृ्त्यू झाला आहे.”