डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार हिलरी क्लिंटन यांना नोव्हेंबरमधील अध्यक्षीय निवडणुकीत आपण पराभूत करू, असे रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. पक्षाची उमेदवारी मिळण्यासाठी त्यांना अडीचशे प्रतिनिधी मते कमी आहेत.
उमेदवारीच्या लढतीत प्रत्येक दिवशी माझी स्थिती मजबूतच होत असून माझे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी आता खिजगणतीतही नाहीत. एकदा रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांना पराभूत करायला मला वेळ लागणार नाही, असे ट्रम्प यांनी कॅलिफोर्निया येथे त्यांच्या समर्थकांपुढे बोलताना सांगितले. सुरुवातीच्या १७ उमेदवारांपैकी आता तीन जण रिंगणात आहेत असे सांगून ट्रम्प म्हणाले की, नोव्हेंबरमधील निकाल चांगलाच लागणार असून मी हिलरी यांना पराभूत करणार यात शंका नाही. १ हजार प्रतिनिधी मतांचा टप्पा ओलांडल्याचा दावा ट्रम्प यांनी केला असून त्यांना उमेदवारीसाठी १२३७ मतांची गरज आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी टेक्सासचे सिनेटर टेड क्रूझ व ओहिओचे गव्हर्नर जॉन कसिच हे आता मागे पडले आहेत. ट्रम्प यांना रोखण्यासाठी क्रूझ व कसिच उर्वरित लढतींसाठी एकत्र आले आहेत.
ट्रम्प यांनी उपाध्यक्षपदासाठी महिलेला उमेदवारी द्यावी, अशी मागणी काही रिपब्लिकन महिला सदस्यांनी केली. अमेरिकेत ५३ टक्के महिला आहेत, त्यांच्या विरोधात ट्रम्प यांनी विधाने केली आहेत व ती त्यांना महागात पडणार आहेत. त्यामुळे त्यांनी उपाध्यक्षपदी महिलेचे नाव जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेस सदस्य सििथया ल्युमिस यांनी केली.
संग्रहित लेख, दिनांक 2nd May 2016 रोजी प्रकाशित
हिलरी क्लिंटन यांना पराभूत करणार – ट्रम्प
डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार हिलरी क्लिंटन यांना नोव्हेंबरमधील अध्यक्षीय निवडणुकीत आपण पराभूत करू

First published on: 02-05-2016 at 01:54 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump beats hillary clinton