रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे आतापर्यंत आघाडीवर असले तरी त्यांचा व्योमिंग व वॉशिंग्टन डीसीमध्ये पराभव झाला आहे. टेड क्रूझ व मार्को रूबिया या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी त्यांचा पराभव केला त्यामुळे आता अध्यक्षीय उमेदवारीची निवडणूक रंगात आली आहे. ट्रम्प यांचा अश्वमेध काहीसा रोखला गेला असून अमेरिकी अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षात चुरस वाढली आहे. डोनाल्ड ट्रम्प ज्या पद्धतीने वक्तव्ये करीत आहेत ते अयोग्य आहे अशा कानपिचक्या अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिल्या आहेत.
रिपब्लिकन उमेदवार सिनेटर क्रूझ व रूबियो यांनी व्योमिंग व वॉशिंग्टन डिस्ट्रीक्ट ऑफ कोलंबियात विजय मिळवले असून त्यांची स्थिती सुधारली आहे. क्रझ यांनी आणखी ९ प्रतिनिधींची मते मिळवली आहेत तर रूबियो यांना दहा मतांचा फायदा झाला आहे. आता फ्लोरिडा, ओहिओ, इलिनॉइस, मिसुरी व उत्तर कॅरोलिनात पंधरा मार्चला प्राथमिक लढती होत आहेत. ट्रम्प यांच्याकडे ४६०, क्रूझ ३६७ व रूबियो १५३ या प्रमाणे मते मिळाली असून ओहियोचे गव्हर्नर जॉन कॅसिच यांना ६३ प्रतिनिधींची मते मिळाली आहेत. पक्षाच्या उमेदवारीसाठी २४७२ प्रतिनिधीपैंकी १२३७ जणांचा पाठिंबा आवश्यक आहे. वॉशिंग्टनमध्ये रूबियो यांना ३७.३ टक्के, कॅसिच यांना ३५.५ टक्के मते पडली आहेत. ट्रम्प यांना १३ टक्के मते पडली आहेत. रूबियो यांनी कॅसिच यांचा पन्नास मतांनी पराभव केला आहे. रूबियो यांनी मिनेसोटा, प्युटरेरिको व वॉशिंग्टन जिंकले आहेत. फ्लोरिडा येथे १५ मार्चला त्यांची कसोटी लागेल. कॅसिच यांच्याबाबतीत ओहिओतील लढत अस्तित्वाची आहे. क्रूझ यांनी ट्रम्प यांना अर्धा डझनहून अधिक राज्यात पराभूत केले आहे. त्यांनी व्योमिंग येथे ट्रम्प यांचा पराभव केला. क्रूझ यांना ६६.३ तर रूबियो यांना १९.५ तर ट्रम्प यांना ७.२ टक्के मते पडली आहेत. डेमोक्रॅटिक पक्षात हिलरी क्लिंटन यांनी नॉर्दर्न मरियाना बेटांवर विजय मिळवला असून त्यांना चार प्रतिनिधी मते पडली. व्हरमाँटचे सिनेटर बर्नी सँडर्स यांना २ प्रतिनिधी मते मिळाली.
ट्रम्प यांच्या सभेत गोंधळ
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ओहिओ येथील डेटर शहरातील सभेत एका निदर्शकाने मंचावर घुसण्याचा प्रयत्न केला, ट्रम्प यांनी तो आयसिसचा समर्थक असावा असे सांगून टाकले. डेटन सिटी येथे घडलेल्या घटनेनंतर ट्रम्प यांनी शिकागोची सभा सुरक्षा कारणास्तव रद्द केली होती. ट्रम्प यांच्या विद्वेषी राजकारणाविरोधात तेथे निदर्शने झाली व त्यांच्याविरोधातील मोठय़ा निदर्शनांमध्ये समर्थक व विरोधक यांची जुंपली होती. माझ्या सभेत घुसणारा तो माणूस खरे तर तुरुंगात असायला हवा कारण तो इस्लामिक स्टेटचा समर्थक आहे. न्यायालय त्याला सोडून देईलही पण आपल्याकडच्या न्यायालयांनी आता अधिक कडक झाले पाहिजे असे ट्रम्प यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा