Donald Trump Trade War : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘जशास तशा’ (परस्पर) करांची घोषणा केल्यानंतर जगभरातील कित्येक देशांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम दिसू लागले आहे. भारतासह बहुसंख्य देशांचे शेअर बाजार गडगडले आहेत. गुंतवणूकदारांना अब्जावधी डॉलर्सचा फटका बसला आहे. अशातच चीनने अमेरिकेला प्रत्युत्तर देत शुक्रवारी अमेरिकी वस्तूंवर आणखी ३४ टक्के आयातशुल्क लागू केलं. तर आंतरराष्ट्रीय बाजारात मक्तेदारी असलेल्या काही दुर्मिळ संयुगांच्या अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवरही शी जिनपिंग यांच्या सरकारने निर्बंध लावले आहेत. जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये छेडलेल्या या व्यापारयुद्धाचा इतर सर्वच देशांना फटका बसला आहे.
दरम्यान, ट्रम्प यांचे निर्णय अमेरिकेतील सरसकट जनतेनेही स्वीकारले नाहीत. शनिवारपासून अमेरिकन नागरिक रस्त्यावर उतरू लागले आहेत. रविवारी अनेक ठिकाणी अमेरिकन नागरिकांनी ट्रम्प सरकारविरोधात निदर्शने केली. दरम्यान, या सगळ्या घडामोडींनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “तेलाच्या, अन्नधान्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. देशातील महागाई कमी झाली आहे.”
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की “तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत, व्याजदर कमी झाले आहेत (मंद गतीने चालणाऱ्या फेडरलने देखील दर कमी करायला हवेत!), अन्नधान्याच्या किंमती देखील कमी झाल्या आहेत. महागाई राहिलेली नाही. दीर्घकाळापासून अमेरिकेचा गैरफायदा घेतला जात होता, तीच अमेरिका आता तिचा गैरफायदा घेणाऱ्या देशांकडून आयात शुल्काच्या माध्यमातून दर आठवड्याला अब्जावधी डॉलर्स आणत आहे. अमेरिकेकडून आयात शुल्क वसूल करणाऱ्या देशांकडून आपण अब्जावधी डॉलर्स आणत आहोत.”
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, “अमेरिकेचा गैरफायदा घेणारा सर्वात मोठा देश म्हणजे चीन, त्यांची बाजारपेठ आता कोसळत आहे. त्यांनी इतकी वर्षे आपल्याकडून आयातशुल्क वसूल केलं. आता त्यांनी आपल्यावरील शुल्क ३४ टक्क्यांपर्यंत वाढवलं आहे, हे हास्यास्पद आहे. आपण परस्पर आयात शुल्काचा निर्णय घेतल्यानंतर त्याला प्रत्युत्तर न देण्याच्या माझ्या इशाऱ्याला काहींनी मान्यता दिली नाही. या देशांनी अनेक दशकांपासून अमेरिकेचा गैरफायदा घेतला आहे. आपला देश आणखी बरंच काही करू शकला असता, मात्र आताच्या स्थितीला भूतकाळातील ‘नेते’ जबाबदार आहेत. मात्र आपण अमेरिकेला पुन्हा महान बनवूया.”