एफबीआयचे माजी संचालक जेम्स कोमी हेच फितुर आहेत हा मला पूर्ण विश्वास आहे असं ट्विट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान रशियाच्या हस्तक्षेपाच्या प्रकरणाची चौकशी करताना जेम्स कोमी यांची एफबीआयच्या संचालकपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. याप्रकरणी अमेरिकेच्या गुप्तचर सिनेट समितीकडून कोमी यांची गुरूवारी चौकशी करण्यात आली. या चौकशीत जेम्स कोमी यांनी ट्रम्प प्रशासनावर सडकून टीका केली आहे. ट्रम्प यांनी एफबीआयवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, एफबीआयच्या कर्मचाऱ्यांना आणि अमेरिकेच्या नागरिकांना हे खोटे आरोप ऐकून घ्यावे लागले असा आरोप गुरूवारी झालेल्या चौकशीदरम्यान कोमी यांनी केला होता.
आज याच आरोपांना ट्रम्प यांनी ट्विटवरून उत्तर देत कोमी यांचा उल्लेख फितुर असा केला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान रशियाने केलेल्या हस्तक्षेपाप्रकरणी मायकल फ्लिन यांची चौकशी करू नये अशी विनंती ट्रम्प यांनी आपल्याला केली होती. मात्र आपण ती न ऐकल्याने आपल्याला हाकलण्यात आले असा आरोपही कोमी यांनी केला आहे. आता या सगळ्या आरोपानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना उत्तर दिले नसते तरच नवल.. आज ट्रम्प यांनी कोमी यांना फितुर असं म्हणत त्यांनी काल दिलेली साक्ष खोडून काढली आहे. कोमी यांनी काहीही म्हटले तरीही त्याला काहीही अर्थ नाही असाही दावा ट्रम्प यांनी केला आहे.
९ मे रोजी कोमी यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. ज्यानंतर कोमीविरूद्ध ट्रम्प असा वाद निर्माण झाला. कोमी आपल्या चौकशीत काय म्हणतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार होते. तसेच कोमी यांनी सिनेट समिती समोर दिलेल्या साक्षीनंतर अमेरिकेतले राजकारण ढवळून निघाले. मात्र आज या सगळ्याची खिल्ली उडवत ट्रम्प यांनी कोमी यांना फितुर म्हटले आहे.